नाशिक : सतीश डोंगरे
दसरा, दिवाळी या मोठ्या सणासुदीत रक्तदाते सुट्टीवर गेल्याने तसेच रक्तदान शिबिरांना ब्रेक लागल्याने जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हाभरात दहा रक्त संकलन केंद्रे असून, या केंद्रांवर पुढील चार ते पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याने रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ३८०० पेक्षा अधिक थॅलेसिमियाचे रुग्ण असून, त्यातील १५० पेक्षा अधिक रुग्णांना दररोज रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्ताचा तुटवडा चिंतेचा विषय बनला आहे.
दरवर्षी सणासुदीत रक्तदान शिबिरांना ब्रेक लागत असल्याने, त्याचा परिणाम रक्तसाठ्यावर काही अंशी होतो. यंदा मात्र रक्तसाठ्यावर इतर वर्षांच्या तुलनेत मोठा परिणाम झाला आहे. त्यास कारण सणासुदीबरोबरच अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस असल्याचेही बोलले जात आहे. सणासुदीत महाविद्यालये, कारखाने तसेच इतर आस्थापनांना सुट्ट्या असल्याने, रक्तदान शिबिरे आयोजित केली जात नाहीत. तसेच या काळात रक्तपेढ्यांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांना देखील म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्याचा परिणाम रक्तसंकलनावर झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात थॅलेसिमिया, सिकलसेल ॲनिमिया, हिमोफेलिया, कर्करोग या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठी असून, त्यांना नियमित रक्ताची गरज भासते. याशिवाय गंभीर दुखापत झालेले तसेच अपघातग्रस्त रुग्णांना देखील ऐनवेळी रक्ताची गरज भासत असल्याने, रक्ताचा तुटवडा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येवून रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्यांकडून केले जात आहे.
अर्पण रक्तपेढीकडून 18 कॅम्प
शहरातील प्रमुख रक्तपेढी असलेल्या अर्पण रक्तपेढीकडून गेल्या ऑॅक्टोबर महिन्यात एकुण १८ शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांमधून ८०४ रक्त बॅगांचे संकलन झाले होते. आक्टोबर महिन्यात या सर्व रक्त बॅगा वितरीत करण्यात आल्या आहेत. अर्पण रक्तपेढीकडे ३५० पेक्षा अधिक थॅलेसिमियाचे रुग्ण असून, दररोज ९ ते १० थॅलेसिमिया मुलांना रक्त दिले जाते. सध्या रक्तपेढीत रक्ताचा साठा जवळपास संपला आहे. याशिवाय जिल्ह्यातील उर्वरीत ९ रक्तपेढ्यांमधील देखील रक्तसाठा जवळपास संपुष्ठात आला आहे.
आचारसंहितेचाही फटका
राजकीय मंडळींकडून रक्तदान शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असते. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याने, रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला हातभार लावण्याची मोठी संधी राजकारण्यांना आहे. मात्र, नगरपालिका, नगरपरिषदेची आचारसंहिता लागू असल्याने, त्याचा फटका रक्तदान शिबिरांना बसत आहे. मात्र, ज्या भागात आचारसंहिता लागू होत नाही, त्या भागात शिबिरे घेणे शक्य असल्याने राजकारण्यांनी पुढे येण्याची गरज आहे. याशिवाय सामाजिक संस्थांनी देखील पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांकडून केले जात आहे.
जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याने, रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी पुढे यावे. याशिवाय ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचे आहे, त्यांनी थेट रक्तपेढीत संपर्क साधावा. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, त्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.डॉ. नंदकिशोर तातेड, अध्यक्ष, अर्पण रक्तपेढी, नाशिक.