नाशिक : प्रभाग क्रमांक १३ मधून आजचे पक्षप्रवेश झाले नसते तरी भाजपचाच विजय झाला असता निष्ठावंतांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली असती. माझा कुणाच्याही प्रवेशाला विरोध नाही. मी मंत्री गिरीश महाजनांवर नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केले गेले. पक्षप्रवेश झाल्यावर पक्ष मोठा होतो पण निष्ठावंतांवर अन्याय नको. पक्ष मोठा होताना निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये, यासाठीच माझा प्रयत्न आहे. जे झाले ते वाईट झाले. वरिष्ठांनी या सर्व विषयांची दखल घ्यावी, अशी भूमिका भाजपच्या निवडणूक प्रमुख तथा आमदार देवयानी फरांदे यांनी मांडली. यावेळी फरांदे यांना अश्रू अनावर झाले.
विरोधानंतरही प्रभाग क्र. १३ मधील शाहू खैरे, यतीन वाघ, विनायक पांडे यांना भाजपात प्रवेश दिला गेल्याने व्यथित झालेल्या आ. फरांदे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, विरोध करण्यापेक्षा मी त्या मतदारसंघाची आमदार असल्याने माझे मत असे होते की, त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता. आमचे उर्वरित सर्व उमेदवारांना घेऊन पक्षाचे तीन असे पॅनल तयार केले गेले असते तर १०० टक्के निवडले जाणार होते, असे लोकप्रतिनिधी या नात्याने मत होते. अन्यथा माझे कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करण्याचे कारण नाही.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे. ते वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करतात. त्यामुळे बाहेरुन आलेल्यांसोबत तीन पक्षातील उमेदवार दिले तर त्यांचा विजय होईल, असे मला वाटत होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. गेल्या ४० वर्षांमध्ये मी स्वत: माझ्यावर कधी अन्याय झाला असेल, पक्षाकडून कुठली भूमिका घेतली गेली असेल स्वत:साठी आजपर्यंत कधी जाहीर भूमिका घेतलेली नाही. पक्षाची मी निष्ठावान कार्यकर्ता आहे. तशी भूमिका मी कधीही घेणार नाही. पण सर्वांनी नेते व्हायचं आणि सगळ्यांनी आपापले बघायचे. मग पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कुणी पाठबळ द्यायचे. त्यामुळे मी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. एवढाच विषय होता, असे फरांदे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपली कुणाविषयीही काहीही तक्रार नाही.दिनकर पाटील, मनसेचे माजी प्रदेश सरचिटणीस
केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. आगामी काळात महापालिकेतही भाजपचीच सत्ता असेल, असे वातावरण आहे. नाशिकचा विकास भाजपच करू शकते, याची खात्री वाटल्याने शहर विकासाच्या भूमिकेतून भाजपमध्ये प्रवेश केला.ॲड. यतीन वाघ, माजी महापौर
काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांचे स्थानिक पातळीवर दुर्लक्ष आहे. स्थानिक पातळीवर अधिकार नाहीत. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिकच्या विकासात योगदान देता यावे, यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.शाहू खैरे, माजी गटनेते
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रत्येक शिवसैनिकांची व्यथा जाणून घ्यायचे. आता पक्षात कोणताही नेता ऐकून घेत नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा व भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. माझी कुणाविषयी काही तक्रार नाही.विनायक पांडे, माजी महापौर