नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची प्रतिष्ठित व प्रभावी अशा राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटविलेला आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्याच मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा असेल.
अत्यंत तळागाळापासून काम सुरू करून विविध राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या उत्तम पेलत विजया रहाटकर यांचे नेतृत्व स्पष्ट होत गेले आहे. प्रत्येक ठिकाणी समरसतेने काम करून आपल्या कौशल्याचा 100 टक्के लाभ त्या पदाला देऊन ती जबाबदारी सर्वोत्तम पार पाडणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. महाराष्ट्र भाजप युवा मोर्च्याच्या उपाध्यक्ष ते भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. त्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या प्रदीर्घकाळ सदस्या देखील राहिल्या आहेत. सध्या त्या राजस्थान भाजपच्या सहप्रभारी म्हणून पक्षाचे काम करीत आहेत. राजस्थान विधानसभेमध्ये भाजपने मिळविलेल्या यशामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.
"राष्ट्रीय महिला आयोगासारख्या संवैधानिक संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे मनःपूर्वक आभार मानते. या महत्वपूर्ण जबाबदारीचे पालन मी निष्ठेने आणि समर्पण भावनेने करेन. शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्थान यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे महिलांच्या क्षमतांना आणि संधींना अधिक गती देण्याचा प्रयत्न करेन. केवळ महिला सक्षमीकरण एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता, महिलांच्या नेतृत्वाखाली विकासयात्रेला चालना देण्याचा माझा प्रयत्न राहील."विजया रहाटकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या नूतन अध्यक्ष