नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आल्याने नाशिक महापालिकेत भाजपच्या सत्ता स्थापनेचे चित्र पुरेसे स्पष्ट असले तरी विरोधकांचे १० नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. यामुळे महापालिकेतील भाजपचे संख्याबळ ८० च्यावर जाईल, असा धक्कादायक दावा भाजपचे निवडणूक प्रभारी तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी करत विरोधकांच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.
नाशिकमध्ये सत्तास्थापनेत महायुतीतील घटक पक्षांच्या समावेशाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री महाजन यांनी बुधवारी (दि.२१) गंगापूर धरण परिसरास भेट देत एअर शोच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नाशिकमध्ये भाजपचाच महापौर होणार याचा पुनरुच्चार करताना सत्तापदांसाठी आपली कोणीही भेट घेतली नसल्याचे नमूद केले.
मला अद्याप एकही नगरसेवक भेटला नाही. एवढेच काय तर, विमानतळावर एकही दावेदार घ्यायला आला नाही, असे सांगत उपस्थित इच्छुकांचीही त्यांनी फिरकी घेतली. दावोसमध्ये नाशिकसाठी मोठी गुंतवणूक होणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रोड आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार असून, नाशिक ते मुंबई एसी लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले, नाशिकमध्ये होणारा एरोबॅटिक शो अविस्मरणीय होणार आहे. ९ फायटर जेट प्रात्याक्षिक दाखवणार आहेत. यामुळे सर्व विभागांनी सतर्कता बाळगावी आणि या शोसाठी शाळकरी मुलांना प्राधान्य द्यावे.
गर्दीचे नियोजन करत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही महाजन यांनी यंत्रणांना दिले आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी उपस्थित राहतील, यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे महाजन यांनी सांगितले. महाजनांकडून स्पीड बोटची राइड एअर शोच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गंगापूर धरणावर आलेल्या मंत्री महाजन यांनी बोट क्लबमध्ये स्पीड बोटच्या सफरीचा आनंद लुटला.
स्पीड बोट चालवणाऱ्या पर्यटकांना पाहिल्यानंतर धाडसी मोहिमांसाठी प्रसिद्ध असलेल्या महाजन यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना बाजूला ठेवून स्पीड बोटच्या माध्यमातून गंगापूर धरणात राइड घेतली. यामुळे सुरक्षा यंत्रणांची मात्र चांगलीच धावपळ उडाली. महाजन यांचा राइडचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला.