नाशिक

Nashik BDO Ashok Bhavari | साहेब चिखलात रुतले... अन् समस्यांचे प्रतिबिंब उमटले!

Nashik BDO Ashok Bhavari | बोरखिंड : दुर्लक्षित रस्त्याचा फटका बीडीओ भवारींना करावा लागला सहन

पुढारी वृत्तसेवा

संदीप भोर : पुढारी वृत्तसेवा बोरखिंड धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था ही ग्रामस्थांसाठी नवी बाब नाही. मात्र, आज याच रस्त्याने प्रशासनालाच वास्तवाची जाणीव करून दिली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी हे धरण परिसराची पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांचे वाहन चिखलात रुतले आणि त्यांना स्वतःलाही गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागली.

दुपारच्या सुमारास भवारी हे चालकासह धरणाकडे निघाले होते. अरुंद, चिखलमय रस्त्यावर वाहन अडकल्यानंतर त्यांनी खाली उतरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तेही चिखलात अडकले. अखेर स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना बाहेर काढले. त्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने अडकलेले वाहनही बाहेर काढण्यात आले.

ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली. निवेदने दिली, पाठपुरावा केला; पण प्रशासनाच्या फाइलमध्ये हा रस्ता कायमचा चिखलात रुतलेला राहिला. आज मात्र त्याच चिखलाने थेट अधिकाऱ्यांनाच अडविल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

बोरखिंड गावकऱ्यांचे पाय चिखलात रुतले तेव्हा प्रशासनाला काहीच दिसले नाही; पण आज साहेबांचे वाहन अडकताच सगळ्यांचे लक्ष रस्त्याकडे गेले. आता तरी या रस्त्याला न्याय मिळेल का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

धरण हा महत्त्वाचा प्रकल्प असताना तेथे जाण्यासाठी सुरक्षित व सुस्थितीतील रस्ता नसणे, ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आपत्तीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना आपत्तीचा सामना करावा लागणे, हेच ग्रामीण भागातील विकासकामांचे वास्तव अधोरेखित करणारे चित्र ठरले आहे.

चिखलात रुतलेले वाहन; विकासाचेही तेच चित्र?

बोरखिंड रस्त्याची अवस्था ही केवळ एका वाहनाच्या अडकल्याची घटना नाही, तर ग्रामीण विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे करणारे वास्तव आहे. वर्षानुवर्षे रस्त्याची मागणी करूनही काम झाले नाही.

अखेर अधिकाऱ्यांनाच चिखलाचा प्रत्यक्ष अनुभव आल्याने, किमान आता तरी या रस्त्याचे नशीब पालटेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. अन्यथा ही घटनाही काही दिवस चर्चेत राहून पुन्हा प्रशासनाच्या फाइलमध्येच रुतून बसेल, अशी उपरोधिक प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT