जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रमजान महिन्याच्या प्रारंभापासून शहरातील अत्तर बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, विविध सुगंधी द्रव्य अर्थात अत्तर खरेदीला मोठी मागणी वाढली आहे. वाढदिवस, कौटुंबिक समारंभ किंवा धार्मिक कार्यक्रम असो, अत्तर हे आकर्षक आणि अर्थपूर्ण भेटवस्तू म्हणून दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील कन्नौज हे देशातील सर्वात मोठे अत्तर उत्पादन केंद्र मानले जाते आणि 'परफ्यूम कॅपिटल' म्हणून ओळखले जाते. येथे फुले, मसाले आणि जडीबुटींपासून पारंपरिक पद्धतीने अत्तर तयार केले जाते.
अंबर, गुलाब, चमेली, कस्तुरी, उद यांसारख्या सुगंधांना विशेष पसंती मिळत आहे. अरब देशांमध्ये काबाच्या गिलाफला उद, गुलाब, कस्तुरी आणि अंबर यांच्या मिश्रणाने सुगंधित केले जाते. रमजानमुळे जुने नाशिकमधील दूधबाजार, जहांगीर मस्जिद परिसर, चौकमंडई आदी भाग अत्तर विक्रेत्यांचे प्रमुख केंद्र ठरले आहेत.
बहुतांश दुकानदार रतलाम, अहमदाबाद, हरियाणा, हिमाचल प्रदेश तसेच मुंबई येथून माल मागवतात. नमाजला जाण्यापूर्वी कपड्यांना अत्तर लावण्याची प्रथा असून, काही जण मशिदीबाहेर नमाजासाठी येणाऱ्यांनाही अत्तर लावतात. हे पुण्याचे कार्य मानले जाते.
या अत्तरांना मोठी मागणी
घरामध्ये सुगंधी मशीनचा वापर करून बखुर, तीव्रा, लैबा यांसारख्या सुगंधी कणांचा वापरही वाढला आहे. गुलाब, अंबर, मुश्क यांसारख्या पारंपरिक सुगंधांना ज्येष्ठांकडून मोठी मागणी आहे, तर तरुणवर्ग हलक्या व आधुनिक सुगंधांना पसंती देत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, 'अत्तर हा फक्त सुगंध नसून आपुलकी, आदर आणि सकारात्मकतेची भावना देणारा दुवा आहे.' रमजानच्या निमित्ताने अत्तर खरेदीत लक्षणीय वाढ झाली असून, सुगंधी बाजारपेठांमध्ये दररोज गर्दीचे चित्र दिसत आहे. पुढील काही दिवसांत मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आमच्या दुकानात सर्वधर्मीय ग्राहक अत्तर खरेदीसाठी येतात. केवळ रमजानच नव्हे तर वर्षभर विविध सण-उत्सव, लग्नसमारंभ आणि खास प्रसंगी लोक आवर्जून अत्तर घेतात. प्रत्येक ग्राहक आपापल्या आवडीप्रमाणे सुगंध निवडतो आणि खूप समाधानाने ते घेऊन जातो.-वसिम अत्तार, व्यापारी