Nashik Assault on wife for conversion
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रेमविवाहानंतर पत्नीने धर्मांतर करावे यासाठी पतीसह सासरच्या पाच जणांनी विवाहितेचा छळ करीत, तिच्या वडिलांकडून सहा लाख रुपये घेतले. तसेच विवाहितेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शहरात घडली आहे. या प्रकरणी पीडितेने अंबड पोलिस ठाण्यात तिच्या पतीसह इतर पाच जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तर सातपूर पोलिस ठाण्यातही महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करीत धर्माप्रमाणे वागावे लागेल, असा दबाव टाकून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, २०१९ पासून संशयितांनी शहरातील जुना कॅनॉल रोड, सदाशिवनगर, रेणुकानगर, वडाळा नाका, सारडा सर्कल परिसरात छळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेच्या फिर्यादीनुसार तिचा पती रमजान जलील शेख, सासू नसिम शेख, दोन दीर समीर आणि जमीर, नणंद नीलोफर शेख आणि तिचा पती शकील शेख (सर्व रा. वडाळा नाका)
यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, पत्नी व नातलगांना क्रुर वागणूक, इच्छापूर्वक दुखापत, एखाद्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने दृष्यकृत्य करणे, धार्मिक भावना दुखाविण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे, जबरी चोरी, फसवणूक, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे या कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
सातपूर येथील महिलेच्या फिर्यादीनुसार, श्रमिकनगर येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय संशयित मोहम्मद आलम (रा. श्रमिकनगर) २०१३ पासून स्वतःची ओळख लपवून पीडितेस राजू नाव सांगितले. तसेच लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यातून पीडितेस आठ वर्षांची मुलगी आहे. त्यानंतरही संशयिताने विवाह करण्यास टाळाटाळ करीत विवाह करायचा असल्यास मुस्लीम धर्माप्रमाणे वागावे लागेल, असे सांगितले. पीडितेला मारहाण करीत तिला घराबाहेर काढले. पीडितेसह संशयित आरोपी हे दोघे दिल्ली येथील रहिवासी असून, दोघेही नोकरीनिमित्त नाशिकमध्ये राहतात. संशयित इंजिनिअर असून, खासगी कंपनीत कार्यरत आहेत.