नाशिक : विठ्ठल मंदिरांमध्ये करण्यात आलेली आकर्षक फुलांची आरास, कॉलेजरोडवरील नामदेव विठ्ठल मंदिरातील मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.   (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik Ashadhi 2025 : पंढरीची वारी आहे माझे घरी !

आज सर्वत्र विठ्ठल नामाचा जयघोष : आषाढीनिमित्त मंदिरे रोषणाईने सजली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : 'ठेवुनिया दोन्ही करकटी.. उभा हा मुकुंद वाळवंटी... हरिनामाचा झेंडा तिथे रोविला तव चरणी.. हा देह सारा वाहिला... उभा कसा राहिला विटेवरी...' अशा अभंगांच्या घोषात रविवारी (दि.६) आषाढी एकादशीचा सण पारंपरिक हर्षोल्हास आणि भक्तिमय वातावरणात उपवास करून साजरा होत आहे. यानिमित्त शहर व परिसरातील विठ्ठल मंदिरे फुलांची आरास, रोषणाईने सजली असून, उपवासाचे पदार्थ, फळे खरेदीसाठी बाजारात चैतन्य दिसून आले.

शहरातील मंदिरांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जुने नाशिकमधील काझीपुऱ्यातील प्राचीन नामदेव विठ्ठल मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. हुंडीवाला लेनमधील सुमारे 150 वर्षे प्राचीन ज्ञानेश्वर मंदिरात सकाळी विठ्ठल- रखुमाई तसेच संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. दिवसभर गीतापाठ, विष्णुसहस्रनाम, हरिभजन, महापूजन, महाआरती आणि प्रसादवाटप होत असल्याने भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

काॅलेजरोडवरील नामदेव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून, मंदिरात फुलांची सुरेख आरास करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजता शिंदे दाम्पत्याच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांसह भजनी मंडळांचे कार्यक्रम होणार असून, दिवसभर महाप्रसाद वाटप होत आहे.

संस्कृती नाशिकतर्फे दिंडी सोहळा

संस्कृती नाशिकच्या वतीने पंढरपूरच्या वारीतील दिंडी भव्य- दिव्य रूपात रविवारी (दि. ६) साजरी होणार आहे. यात शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दिंडीत दोन हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी बसची सुविधा करण्यात आली आहे. तसेच सर्व सहभागी भाविकांना आणि विद्यार्थ्यांना अल्पोपाहार व पाण्याची बाटली देण्यात येत आहे. भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन नाशिक संस्कृतीचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले.

कालिदास कलामंदिरात 'पंढरीचे सुख'

स्वरांगण प्रस्तुत 'पंढरीचे सुख' या भक्तिसंगीत मैफलीचे आयोजन महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले आहे. यामध्ये ख्यातनाम गायिका आसावरी खांडेकर गायन करतील. पुंडलिक पिंपळके निरुपण करतील. निनाद शुक्ल गायनासह संवादिनी वादन करतील.

पंचवटीत 'राजा पंढरीचा'

पंचवटीतील श्री काळाराम मंदिराजवळील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुजारी परिवारातर्फे 'राजा पंढरीचा' हा सांस्कृतिक संगीत कार्यक्रम होत आहे. नंदकुमार देशपांडे आणि 'सरगम' संस्थेचे विद्यार्थी भक्तिसंगीत सादर करतील. द्वारका चौकातील इस्कॉन मंदिरात कलागृह आणि स्वरर्व्हसतर्फे 'नृत्यसुरांजली' हा विठ्ठल भक्तीवरील नृत्य, संगीत आणि कलाकारी यांचा संगम असलेला कार्यक्रम सादर होणार आहे. पाथर्डी फाटा येथील नरहरीनगरमध्ये सिद्ध कुटीर पांडुरंग मंदिरात 'स्वरयात्री'तर्फे आषाढी एकादशी हा अभंगांचा कार्यक्रम होणार आहे. यात श्रुती जोशी यांना नितीन जोगळेकर हार्मोनियम, तर अनिल कुलकर्णी हे तबला साथसंगत करणार आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांची भरली मांदियाळी ... पहा फोटो

हरिनामाचा झेंडा तिथे रोवत डोईवर तुळशी घेऊन विठुमाऊलीच्या दर्शनाने धन्य झालेली महिला वारकरी.
श्री विठ्ठल - रखुमाईच्या दर्शनासाठी जमलेले वारकरी
विठुनामात दंग झालेले बाल वारकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT