Eco Friendly Ganpati Decoration 
नाशिक

Eco Friendly Ganpati Decoration | टाकाऊ वस्तूंपासून साकारले हुबेहूब त्र्यंबकेश्वर मंदिर! नाशिकच्या रमेश पवार यांची कल्पकता

Eco Friendly Ganpati Decoration | जुलूस-ए-गौसियानिमित्त बंदोबस्ताचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आयुष्यातील परिस्थिती माणसाची वाट कठीण करू शकते. मात्र, मनातील ध्येय आणि काहीतरी वेगळे घडविण्याची ऊर्मी असेल, तर त्याच परिस्थितीतून स्वतःची ओळख निर्माण करता येते. मूळचे सटाणा येथील रमेश पवार यांचा प्रवास याचेच उदाहरण आहे. गणेशोत्सवात त्यांच्या कलेला भक्तीची जोड मिळाली.

घरात गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करताना यंदा नेहमीपेक्षा काही तरी वेगळे करण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यातून आकाराला आले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराचे सुंदर प्रतिरूप. उपलब्ध साहित्य, स्वतःची कल्पनाशक्ती आणि अनेक तासांचे परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हा देखावा उभा केला.
काही वर्षांपूर्वी सटाण्याहून नाशिकमध्ये आलेल्या पवार यांनी सर्वसामान्य कुटुंबातून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. शहरात स्थिरावताना त्यांनी 'पांडव कलर लॅब' या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कालांतराने परिस्थितीनुसार एका कंपनीत नोकरी स्वीकारली. बदलत्या काळासोबत कामाचे स्वरूप बदलले, पण स्वतःच्या मेहनतीवर पुढे जाण्याची वृत्ती कायम राहिली.

दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी आपल्या अंगातील कलाकारालाही जपले. घरातील टाकाऊ वस्तू फेकून न देता, त्यातून काहीतरी आकर्षक आणि उपयोगी वस्तू घडविण्याची त्यांना विशेष आवड. याच छंदातून अनेक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आकाराला आल्या.

मिग - २९ सारख्या लढाऊ विमानाची प्रतिकृती घरच्या घरी तयार करून त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या प्रयोगांना नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. मंदिराचे स्वरूप आणि त्यातील बारकावे पाहण्यासाठी परिसरातील नागरिक पवार यांच्या घरी आवर्जून भेट देत आहेत.

गणरायाच्या दर्शनाबरोबरच त्र्यंबकेश्वरच्या प्रतिकृतीचे आकर्षणही भाविकांना अनुभवायला मिळत आहे. सटाण्यातून नाशिकपर्यंतचा प्रवास, स्वतःचा व्यवसाय, पुढे नोकरी आणि संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत जोपासलेली कला रमेश पवार यांची ही वाटचाल सामान्य माणसातील असामान्य सर्जनशीलतेची ओळख करून देते. टाकाऊ वस्तूंना कल्पकतेने नवे रूप देत आपल्या कलेतून वेगळी छाप निर्माण करणाऱ्या रमेश पवार यांच्या प्रयत्नांचे अनेकांनी अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT