नाशिक बाजार समिती Pudhari News Network
नाशिक

Nashik APMC : माजी सभापतींच्या कामाची होणार चौकशी

कल्पना चुंभळे : नाशिक बाजार समितीची सर्वसाधारण सभा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळात सभेची मान्यता न घेताच लाखोची कामे करण्यात आली आहेत. त्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार आहे. तसेच झालेल्या बांधकामांची चौकशी व्हावी, यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पत्रही देण्यात आल्याची माहिती बाजार समिती सभापती कल्पना चुंभळे यांनी सर्वसाधारण सभेत दिली.

सभापती चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी पिंगळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांतील गैरव्यवहाराबाबत चर्चा झाली. २९ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या इत्तिवृत्तातील पान क्र. २३५ आणि २३६ वर नवीन कागद चिकटविण्यात आला आहे. विभाजनाचा ठराव सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला नसतानाही मागील तारखेने तसा ठराव लिहण्यात आला आणि जावक करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र हा प्रस्ताव मार्च २०२५ ला पणन संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.

पिंगळे यांच्या काळात ज्या काही सभा झाल्या त्यास सदस्य उपस्थित नसतानाही त्यांची नावे ठरावास सूचक आणि अनुमोदक म्हणून टाकण्यात आली आहेत. पेठरोड मार्केट येथील डिपीरोड बंद करता येत नसतानाही शाळेलगतचा रस्ता भिंत टाकून बंद करण्यात आला आहे. रस्त्याचा वापर शाळेकडून केला असतानाही पिंगळे यांनी त्यावर आक्षेप नोंदविला नसल्याचा आरोप चुंभळे यांनी केला आहे.

सभेत या विषयावर झाली चर्चा

  • द्राक्षांसह निर्यातक्षम शेतमालांसाठी टेस्टिंग लॅब

  • फळविभाग ट्रिमिक्स रस्ते क्राँक्रीटीकरण

  • सोलर पॅनल बसविणे

नाशिक बाजार समितीत भ्रष्टाचार : देवीदास पिंगळे

पंचवटी : नाशिक बाजार समिती गेल्या सहा महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. समितीचे 25 कोटी 25 लाखांवरून 18 कोटींपर्यंत उत्पन्न आले आहे. संचालक मंडळाचे समितीच्या कामकाजावर कोणतेही लक्ष नसून, पदाधिकार्‍यांकडून केवळ वसुलीचे उद्दिष्ट असल्याचा आरोप करत वाढदिवसालादेखील व्यापार्‍यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी केला.

बाजार समितीची सभा सभापती कल्पना चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात चुंभळे यांनी जी सभापती देवीदास पिंगळे यांच्या कार्यकाळात सभेची मान्यता न घेताच लाखो रुपयांची कामे करण्यात आली, त्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच झालेल्या बांधकामांची चौकशी करण्यात यावी, यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पत्रही देण्यात आल्याची माहिती दिली. परंतु पिंगळे यांनी सर्व आरोप फेटाळत आपणच सहा महिन्यांच्या कारभारावर पोलिसात आणि शासनाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, चुंभळे यांच्या कार्यकाळात मोठे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पिंगळे यांनी केला आहे.

लवकरच कारवाईची शक्यता

गेल्या काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे आपली सत्ता उलथवून चुंभळे यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. त्यात 3 कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू आहे. लवकरच कारवाई होण्याची शक्यता पिंगळे यांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT