

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन सभापती निवडीची निवडणूक प्रक्रिया बुधवार, (दि. १९) रोजी बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. माजी सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि.११) रोजी झालेल्या बैठकीत १५ विरुद्ध ० ने तो मंजूर करण्यात आल्याने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सभापती देवीदास पिंगळे यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत संचालकांनी एकत्र येत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. पिंगळे यांच्या गटातीलच काही नाराज संचालक माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली आले आणि नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली. सभापतीपदासाठी माजी सभापती शिवाजी चुंभळे आणि कल्पना चुंभळे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर सभापतीपदी कल्पना चुंभळे यांची बिनविरोध निवड झाली.
गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीचे काही संचालक सहलीवर गेले होते, मात्र मंगळवारी (दि.१८) दुपारी हे संचालक नाशिकमध्ये परतले होते. त्यानंतर आज सकाळी ११ वाजता थेट बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत दाखल झाले. यानंतर सभापतीपदासाठी अर्ज मागविण्यात आले असता कल्पना चुंभळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.
यावेळी माजी सभापती शिवाजी चुंभळे, जेष्ठ संचालक संपतराव सकाळे, उपसभापती विनायक माळेकर, राजाराम धनवटे, तानाजी करंजकर, धनाजी पाटील, युवराज कोठुळे, प्रल्हाद काकड, भास्कर गावित, जगन्नाथ कटाळे, कल्पना चुंभळे, सविता तुंगार, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील हे उपस्थित होते.