नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दुगाव फाटा येथे बुधवारी (दि.२३) मध्यरात्री १ वाजता नाशिक तालुका पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारची तपासणी केली. या कारमध्ये एक लाख ९७ हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी रोकड जप्त करून ती रोकड जिल्हा प्रशासनाकडे सोपवली आहे. पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात जाणारी कार पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अडविली. या कारमध्ये एक लाख ९७ हजार ५०० इतकी बेहिशेबी रक्कम या कारमध्ये आढळली. त्यानंतर ही रोकड जप्त करत पोलिसांनी ती जिल्हा प्रशासनाकडे जमा केली. बेहिशेबी रक्कमेबद्दल दोघांना ताब्यात घेण्यात आले असून ते दोघे व्यापारी असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. त्याच्याकडे ही रोकड कशी आली, याबाबतचा तपास सुरू आहे. नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.