नाशिकरोड/नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताकदिनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याच्या निषेधार्थ नाशिकरोड ते शालिमार दरम्यान हजारो संविधानप्रेमींनी मोर्चा काढत महाजन यांच्या राजीनाम्याच्या मागणीची जोरदार मागणी केली. 'महाजन हटाओ, नाशिक बचाओ' घोषणांनी नाशिकरोड दणाणून गेला.
प्रजासत्ताकदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. म्हणून वनविभागाच्या दोन महिला कर्मचारी माधवी जाधव व दर्शना सलपुरे यांनी आक्षेप घेत तेथे तीव्र घोषणाबाजी केली होती. मंत्री महाजन यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने दिलगिरी ही व्यक्त केली.
मात्र संविधानप्रेमी व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याच पार्श्वभूमीवर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाची सुरुवात नाशिकरोड येथील आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. नाशिकरोड ते शालिमार असा दहा किलोमीटरचा मोर्चा संविधानप्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीने काढण्यात आला.
सुरुवात जलसाकार महिलांच्या वतीने सामाजिक, राजकीय व प्रबोधनात्मक गीतांच्या सादरीकरणाने करण्यात आली. यावेळी सात वर्षांची चिमुकली गार्गी भालेराव हिने संविधानाचे प्रास्ताविक सामूहिकरीत्या वाचन केले. त्यानंतर 'डॉ. आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो' अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
नाशिकरोड येथील आंबेडकर पुतळा परिसरामधील दुकानदारांनी, व्यावसायिकांनी आपापली दुकाने त्यावेळी बंद ठेवली होती. सायं. ४. ३० च्या सुमारास मोर्चा हा शालिमार येथे आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. त्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने महाजन यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे निवेदन पुष्पा वावळे, डॉ. प्रमिला पवार, चैताली भालेराव, वासंती दीक्षित, अॅड. स्वाती भालेराव, कल्याणी वाघ, सुरेखा शिंदे, प्रज्ञा जेऊघाले, माया काळे, उज्ज्वला पाळंदे, आशा खरात, आयशा सलीम खान, नीलोसार सर्फराज, लीना स्वामी यांनी दिले.
कडक बंदोबस्त
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस उपआयुक्त किशोर काळे, मोनिका राऊत सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, अद्विता शिंदे, सुधाकर सुरडकर, डॉ. सचिन बारी यांच्यासह पोलिस निरीक्षक मधुकर कड, राकेश चौधरी, जितेंद्र सपकाळे, जयंत शिरसाट, संजीव फुलपगारे, मनोहर कारंडे, श्रीनिवास देशमुख, सचिन खैरनार व २५० हन अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
या होत होत्या घोषणा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, जातिवाद धोका है हक मारो मोका है, संविधान वाचवा लोकशाही टिकवा, गिरीश महाजन माफी नको राजीनामा हवा, आझाद भारत में बाबासाहेब का अपमान नही सहेंगे, संविधान के सन्मान में हम सब मैदान में, नाशिक बचाओ, महाजन हटाओ, संविधान वाचवा लोकशाही टिकवा आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता
महापुरुषांचे फोटो मोर्चात
झळकले छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, संत रोहिदास महाराज, शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, माता रमाई, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांचे फोटो मोर्चेकऱ्यांच्या हातात झळकत होते.
मोर्चावेळी वाहतूक खोळंबली
नाशिकरोड ते शालिमारदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. यामुळे तब्बल तीन ते चार तास नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पोलिसांनी शिताफीने प्रयत्न करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
भव्य रथाचे आयोजन
मोर्चाच्या वेळी डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य रथाचे आयोजन करण्यात आले होते. पंचरंगी झेंडे, भगवे व निळे झेंडे मोर्चेकऱ्यांच्या हातात झळकत होते. फुले-शाहू-आंबेडकरवादी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मोर्चाचे नेतृत्व सामूहिक महिलांच्या वतीने करण्यात आले होते. १३८ फूट लांबीचा तिरंगी झेंडा हे मोर्चाचे प्रमुख आकर्षण ठरले.