सिडको : अंबड महालक्ष्मीनगर येथे श्री ज्वेलर्स दुकानाचे मालक दीपक घोडके व मनीषा घाेडके यांच्याशी चर्चा करताना आमदार सीमा हिरे.  (छाया : राजेंद्र शेळके)
नाशिक

Nashik Ambad Police | अंबड पोलिस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकाची उचलबांगडी

दरोड्यानंतर पोलिस आयुक्तांची कडक कारवाई : राकेश हांडे नवे प्रभारी, सुनिल पवार दुय्यम निरीक्षकपदी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक, सिडको : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदुपारी श्री ज्वेलर्स या सराफी दुकानात सराफ्याच्या छातीला बंदुक लावत 30 तोळे जबरी चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या दरोड्याची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेत तेथील अधिकाऱ्यांचीच उचलबांगडी करीत दणका दिला आहे. पोलिस निरीक्षकांसह हद्दीतील गस्त व पोलिसिंगसंदर्भात जाब विचारून पोलिस आयुक्तांनी 'प्रभारी' निरीक्षकांची उचलबांगडी केली आहे.

वाहतूक युनिट एकच्या राकेश हांडे यांना अंबड पोलिस ठाण्याचे 'प्रभारी' केले असून, अंबडचे तत्कालीन 'प्रभारी' सुनिल पवार यांना 'दुय्यम' निरीक्षकपदी नियुक्त केले आहे. तसेच यासह गुन्हे युनिट दोनचे 'प्रभारी' विद्यासागर श्रीमनवार यांना वाहतूक एकमध्ये नेमून, गुन्हे एकचे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांना गुन्हे दोनचे 'प्रभारी' केले आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. १७) दुपारी एका सराफ दुकानात तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून चोवीस लाख रुपयांचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर अंबड पोलिस, गुन्हे शोध पथकांनी धाव घेत तपासाला सुरूवात केली. गुन्हे शाखा युनिट एकच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे मंगळवारी (दि. १८) पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलिस ठाण्यांसह पथकांच्या वरिष्ठ निरीक्षकांची कानउघाडणी केली.

यासह पोलिस आयुक्तांनी अंबडच्या प्रभारी निरीक्षकांना त्याच पोलिस ठाण्यातच 'दुय्यम' पदावर काम करण्याचे आदेश दिले. तर वाहतूक युनिट एकचे निरीक्षक राकेश हांडे यांना अंबडचे 'प्रभारी' करण्यात आले. दरम्यान, गंगापूर रस्त्यावरील दहा दिवसांपूर्वी मद्यधुंदावस्थेत तरुणांनी धिंगाणा केल्यावर गंगापूरचे तत्कालीन 'प्रभारी' सुशिल जुमडे यांना नियंत्रण कक्षात नेमून तेथील 'दुय्यम' निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांना 'प्रभारी' करण्यात आले आहे.

दरम्यान पश्चिम मतदार संघाचे आमदार सीमा हिरे यांनी सराफ दीपक घोडके व मनिषा घोडके यांची भेट घेत चर्चा केली आणि त्यांना धीर दिला. आ. हिरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अंबड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी राकेश हांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तीन पथके रवाना

दरोडेखोरांच्या तपासासाठी अंबड पोलिसांचे तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. पोलिसांनी अंबड गाव व परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT