

सिडको : अंबड परिसरातील महालक्ष्मीनगरमधील श्री ज्वेलर्स या सराफी दुकानात भरदुपारी तीन दरोडेखोरांनी व्यावसायिक दाम्पत्याला बंदुकीचा धाक दाखवित 30 तोळे वजनाचे सुमारे 24 लाख रुपये किमतीचे दागिने लुटून पोबारा केला. सोमवारी (दि.17) भरदुपारी दोनच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने परिसरातील व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, दरोडेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
महालक्ष्मीनगर येथे दीपक घोडके यांच्या मालकीचे श्री ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे घोडके दाम्पत्य दुकानात बसलेले असताना दोनच्या सुमारास दोन दरोडेखोर दुकानात शिरले. ग्राहक दुकानात आल्याचे समजून दीपक घोडके यांच्या पत्नी काउंटरच्या बाहेर उभे राहिल्या. यावेळी दुकानात शिरलेल्या दोघांपैकी एकाने दीपक घोडके यांच्या छातीला बंदूक लावत तसेच त्यांच्या पत्नीला आरडाओरड करू नका, बाहेर पाहू नका, कोणाला बोलवू नका अन्यथा गोळी घालेन अशी धमकी देत दोघांनीही दुकानातील मणीमंगळसूत्र, अंगठी, सोन्याचे मणी यासह विविध दागिने असा सुमारे २4 लाखांचा ऐवज चोरून दुकानाबाहेर काही अंतरावर थांबलेल्या तिसऱ्या संशयितांच्या दुचाकीवरून पोबारा केला. यानंतर काही क्षणात घोडके दाम्पत्याने आरडाओरड केल्याने अंबड पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. यानंतर पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह गुन्हे शोध पथकाने फौजफाट्यासह दाखल होत पाहणी केली. दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात असून, पोलिस पथके शोधार्थ रवाना केले आहेत. या प्रकरणी दीपक घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन दरोडेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ज्वेलर्सचा दुकानात शिरलेले दोन्ही दरोडेखोर मराठी-हिंदी मिश्रित भाषेत बोलत होते. ज्वेलर्सचा दुकानाच्या आतील सीसीटीव्ही कॅमेरे दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने पोलिसांना दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाही. मात्र, पळून जाताना बाहेरील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत.
ज्वेलर्सचे दुकान असलेला भाग वर्दळीचा आहे. मात्र, दुपारच्या वेळेत या भागात शांतता असते. याचा फायदा घेऊन दरोडा टाकला गेला. याबाबत संशयितांनी आधीच दुकानाची रेकी केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.