Nashik Ambad MIDC Accident 
नाशिक

Nashik Ambad MIDC Accident | दोन्ही हात गेले, न्यायासाठी तीन महिने हेलपाटे !

Nashik Ambad MIDC Accident | निर्दयी प्रशासन : वाचवलंच कशाला?, कामगाराचा आक्रोश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीतील एम. के. फोर्जिंग कंपनीत झालेल्या भीषण अपघातात दोन्ही हात गमावलेल्या कामगाराला तब्बल तीन महिने उलटूनही न्याय मिळालेला नाही. प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आणि कारखाना व्यवस्थापनाच्या कथित बेफिकीरीच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.१२) दुर्घटनाग्रस्त कामगाराने संघटनेच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडले. मात्र, अशातही त्याला केवळ आश्वासन मिळाले.

आता येत्या सोमवारी व्यवस्थापनासोबत बैठक होणार असल्याचे त्याला आश्वासित केले असले तरी, न्यायाबाबत तो साशंकच आहे. अमरजीत प्रसाद (३२) हा कामगार गेल्या नऊ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने एम. के. फोर्जिंगमध्ये काम करत आहे. १८ मार्च रोजी मशीनवर काम करत असताना झालेल्या भीषण अपघातात त्याचे दोन्ही हात निकामी झाले. मात्र अपघातानंतर तीन महिने उलटूनही ना जबाबदारी निश्चित झाली,

ना नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागला, ना दोषींवर कारवाई झाली. याप्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. अखेर जनक्षोभवाढल्यानंतर विभागाने ८ जून रोजी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र नोटीस देऊनही विभागाने कुठलीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे संतप्त कामगाराने ठिय्या आंदोलन करीत न्याय द्या, अन्यथा मरण पत्करेन अशी भूमिका घेतली.

'मुझे बचाया ही क्यों... मरने ही दिया होता'

न्यायासाठी दारोदारी फिरूनही काहीच निष्पन्न होत नसल्याने अमरजित प्रसाद याचा संयम सुटला. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक नरेश भारुळे यांच्यासमोरच त्याने संतप्त शब्दांत आपली वेदना व्यक्त केली. 'मुझे बचाया ही क्यों... मरने ही दिया होता!' दोन्ही हात गमावलेल्या तरुणाच्या या शब्दांनी प्रशासनाच्या संवेदनाहीनतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

हात गेले... लग्नही मोडले

या अपघाताने अमरजितचे केवळ हातच हिरावले नाहीत, तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. वडील नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्यावर होती. आई बिहारमध्ये घरकाम करते, तर लहान भावाच्या शिक्षणाची जबाबदारीही त्वाच्यावरच आहे. नुकतेच त्याचे लग्न ठरले होते; मात्र अपघातानंतर वधूपक्षाने संबंध तोडल्याने त्याचे लग्नही मोडले.

संबंधित कारखान्यात वारंवार अपघात होत 66 असतानाही सुरक्षा यंत्रणा झोपेत आहे. औद्योगिक सुरक्षा विभाग कामगार उपआयुक्त कार्यालयाकडे बोट दाखवतो, तर कामगार उपआयुक्त कार्यालय सुरक्षा विभागाकडे. एका कामगाराचे दोन्ही हात गेले, आयुष्य उद्ध्वस्त झाले, तरीही तीन महिने प्रशासन आणि व्यवस्थापन फक्त कागदांची देवाण-घेवाण करत बसणार का? अमरजितला न्याय मिळाला नाही तर बेमुदत आंदोलन छेडले जाईल.
कैलास मोरे, अध्यक्ष, दुर्घटना कामगार संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT