त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळा नजीक येत आहे तसे आखाड्यांच्या संपत्तीच्या संरक्षणासाठी काही साधू-महंतांनी पिस्तूल परवाना मिळावा म्हणून प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. याबाबत आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज यांनी आखाड्याच्या नावाने कोणालाही शस्त्र परवाना देण्याची नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे. आवश्यकता आखाड्यांच्या संपत्तीचे संरक्षणासाठी आखाड्यातील साधू सक्षम आहेत.
तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रत्येक आखाड्यात २४ तास ड्यूटीवर असलेले पोलिस कर्मचारी तैनात असतात. काही साधू-महंत आचार्य महामंडलेश्वर यांनी स्वतःचे सुरक्षारक्षक तैनात केलेले असतात. मात्र, अलीकडे आखाड्याच्या नावाने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी आग्रही असतील त्यांची तपासणी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने करावी. त्यांना कशासाठी शस्त्र परवाना पाहिजे आहे त्याची माहिती घ्यावी आणि आवश्यक ती कार्यवाही करावी. मात्र आखाड्यांच्या संरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात येऊ नये.
सिंहस्थ कुंभमेळा आटोपल्यानंतर प्रत्येक आखाड्यात एक अथवा दोन साधू वास्तव्यास असतात. देवतांचे पूजाअर्चा आणि आखाड्याची देखभाल करतात, मात्र त्यासाठी शस्त्र परवाना आवश्यक नाही, शस्त्राचा वापर वैयक्तिक कारणासाठी होऊ शकतो आणि त्यामुळे साधूंबाबत चुकीचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचण्याची शक्यता वाढते.
महंत शंकरानंद सरस्वती महाराजांनी सर्व आखाड्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यामध्ये कोणी शस्त्र परवाना मागितला आहे का? याची माहिती घेतली जाणार आहे. आखाड्याच्या पंचांच्या परवानगीशिवाय आखाड्याच्या नावाने शस्त्र परवाना देण्यात येणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी.
आखाड्यांच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी शस्त्र परवाना देण्याची आवश्यकता नाही. आखाड्यात आवश्यकतेप्रमाणे पोलिस बंदोबस्त मिळत असतो. तसेच काही साधूंचे वैयक्तिक सुरक्षारक्षकदेखील असतात. शासनाने तपासणी करून कार्यवाही करावी.
- महंत शंकरानंद सरस्वती महाराज, अध्यक्ष तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाडा