नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळावीत म्हणून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार कृषी विभागाने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. यात नियमांचे उल्लंघन आणि गैरप्रकार करणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई करण्यात येत असून, नुकतीच १७ केंद्रांवर निलंबनाची नवीन कारवाई करण्यात आल्याची माहिती परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.
त्यामुळे दि. १ एप्रिलपासून सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ८६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागाने केलेल्या तपासणीत अनेक विक्री केंद्रांवर नियमबाह्य व्यवहार आणि नोंदींमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत. यात कृषी सेवा केंद्र प्रामुख्याने काही ठिकाणी खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी ई-पॉस यंत्राद्वारे व्यवहार करताना कंपनीकडून प्राप्त झालेली पावती वेळेत स्वीकारली नसल्याचे निदर्शनास आले.
तसेच ई-पॉस प्रणालीतील साठा व प्रत्यक्ष उपलब्ध साठा यांमध्ये तफावत, रोख वह्या व स्टॉक नोंदवहीतील विसंगती, खत वितरणाबाबत आवश्यक नोंदी न ठेवणे अशा प्रकारच्या त्रुटी आढळल्या. त्यामुळे संबंधित केंद्रांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत खत, बियाणे, कीटकनाशक विक्रीशी संबंधित विविध अनियमिततांमुळे एकूण ८६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित झाले आहेत.
जादा दराने विक्री केल्यास कठोर कारवाई
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषिनिविष्ठांचा (खते, बियाणे) पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी प्रशासनाने सर्व केंद्रांना कडक सूचना दिल्या आहेत. निकृष्ट दर्जाच्या साहित्याची विक्री करणे किंवा निर्धारित दरापेक्षा जास्त किंमत वसूल करणे, अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये दोषी आढळणाऱ्या केंद्रांवर यापुढे कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा रवींद्र माने यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करावीत. खरेदी करताना पक्के बिल घेणे बंधनकारक असून, ई-पॉस यंत्राद्वारेच व्यवहार होत असल्याची खात्री करावी. कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून नियमबाह्य व्यवहार, जादा दर आकारणी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास संबंधित पंचायत समितीतील कृषी अधिकारी अथवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या ७८२१०३२४०८ या क्रमांकावर किंवा व्हाट्सअॅपद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन माने यांनी केले आहे.