नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अमरावती जिल्हा रुग्णालयातील स्त्री विभागाला लागलेल्या आगीत तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाने रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलली आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमधील आयसीयू (ICU), एनआयसीयू (NICU), पीआयसीयू (PICU) आणि सीसीयू (CCU) विभागांचे अग्निसुरक्षा व विद्युत सुरक्षा ऑडिट तातडीने करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी सोमवारी (दि. २४) याबाबत पत्र काढले असून, मागील सहा महिन्यांत संबंधित अतिदक्षता विभागांचे अग्निसुरक्षा व विद्युत सुरक्षा ऑडिट झाले नसल्यास ते तातडीने करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
याशिवाय संपूर्ण रुग्णालय इमारतीचे अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा आणि लिफ्ट सुरक्षा ऑडिट करण्याचेही आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालयातील मुख्य विद्युत वितरण पेटी, वायरिंग, ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, ऑक्सिजन जनरेशन प्लांट तसेच आग लागण्याचा संभाव्य धोका असलेल्या ठिकाणांच्या विशेष तपासणीच्या सूचना दिल्या आहेत.
खासगी रुग्णालयांनीही सक्षम शासकीय किंवा खासगी संस्थेमार्फत, तर शासकीय रुग्णालयांनी शक्यतो शासकीय यंत्रणेमार्फत ऑडिट करून घ्यावे, असे स्पष्ट केले आहे. ऑडिटमध्ये आढळणाऱ्या त्रुटी विहित कालमर्यादेत दूर करून त्याबाबतचा अहवाल सादर करणे रुग्णालयांना बंधनकारक केले आहे. अग्निशामक यंत्रणा, स्मोक डिटेक्टर्स आणि फायर अलार्म कार्यरत आहेत की नाही, याची खात्री करण्यासह आपत्कालीन निर्गमन मार्ग कायम अडथळामुक्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या स्त्री विभागात व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर आग लागून तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेने रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये अशा दुर्घटना घडू नयेत आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करता यावे, यासाठी प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांना गती दिली आहे.
आयसीयू मधील व्हेंटिलेटर, वॉर्मर, मॉनिटर आणि अन्य वैद्यकीय उपकरणांचा विद्युत भार तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. शॉर्टसर्किट किंवा ओव्हरलोडमुळे दुर्घटना होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी रुग्णालय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियमित मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्सिजन पाइपलाइन व सिलेंडर सुरक्षित ठेवणे, वैध अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) असल्याची खात्री करणे तसेच गंभीर आणि नवजात रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर कसे करावे, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यावर भर दिला आहे.