Nashik Illegal Cattle Transport pudhari photo
नाशिक

Nashik Illegal Cattle Transport | जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे गजाआड

Nashik Illegal Cattle Transport | या कारवाईत पिकअप वाहनासह चार गायी व एका नर वासराची सुटका करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी होणारी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करीत सुमारे ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पिकअप वाहनासह चार गायी व एका नर वासराची सुटका करण्यात आली.

ही कारवाई आडगाव टी - पॉइंट परिसर व डी-मार्टजवळ करण्यात आली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त परिमंडळ १ मोनिका राऊत तसेच सहायक पोलिस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जनावर वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शनिवारी (दि. १६) रात्रपाळीत हवालदार मनोज परदेशी यांच्या पथकातील अंमलदार प्रीतम बोराटे यांना माहिती मिळाली होती की, पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून काळ्या ताडपत्रीखाली जनावरांची बेकायदेशीर वाहतूक केली जाणार आहे. त्यानुसार आडगाव टी-पॉइंट येथे सापळा रचण्यात आला होता.

संशयास्पद वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वाहनाचा वेग वाढवत नाशिकच्या दिशेने पलायनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून डी-मार्ट परिसरात वाहन (एमएच १५, एजी ३४२५) हे पकडले. वाहन तपासणीत त्यात चार गायी व एक नर जातीचे वासरू दाटीवाटीने व अमानुष पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अंमलदार प्रीतम बोराटे यांच्या फिर्यादीवरून आडगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत सुमारे २ लाख २५ हजार रुपये किमतीचे पिकअप वाहन, चार गायी व एक नर वासरू असा एकूण ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जनावरांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना श्री राजलक्ष्मी गोशाळा येथे ठेवण्यात आले असून, पोलिस हवालदार मनोज परदेशी अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक निखिल बोंडे, विकास पंचमुख, पोलिस उपनिरीक्षक भगवान घोडे, मनोज परदेशी यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT