बँड पथकाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण जागीच ठार  pudhari Photo
नाशिक

Nashik Accident | बँड पथकाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण जागीच ठार

पुढारी वृत्तसेवा

देवळा ; देवळा कळवण रोडवरील भऊर फाट्यावर मंगळवारी (दि. १७ )रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात खर्डे ता. देवळा येथील अविवाहित तरुण नितीन बाजीराव जाधव (२३) हा जागीच ठार झाला. देवळा पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , काल मंगळवार (दि.१७ ) रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास खर्डे ता. देवळा येथील नितीन जाधव (२३) हा युवक आपल्या दुचाकीने घरी येत असताना देवळा कळवण रोडवरील भऊर फाटा नजीक बागलाण तालुक्यातील बँड पथकाचे वाहन वाहतुकीचे नियम न पाळता रस्त्यावर उभे असताना त्या वाहनाची जबर धडक नितीन जाधव याला बसल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच सपोनि दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या बँड पथकाच्या वाहनाला ताब्यात घेत चालकावर गुन्हा दाखल केला.

अपघातात तरुण ठार झाल्याने खर्डे गावावर शोककळा पसरली आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर वाहन चलविणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी ,अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मयत नितीन जाधववर देवळा ग्रामीण रुग्णालयात आज बुधवारी (दि. १८) रोजी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करण्यात येऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन यांच्या पश्चात आई , वडील , दोन बहिणी , एक भाऊ असा परिवार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT