धुळे : गणेश विसर्जनासाठी धुळे तालुक्यातील बिलाडी येथील धरणामध्ये धरणावर गेलेल्या दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी कुटुंब असलेल्या या परिवारावर संकट कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धुळे तालुक्यातील बिलाडी येथे राहणारे चैतन्य सुनील पाटील ( वय 22) व लोकेश सुनील पाटील( वय 19) हे काल बिलाडी येथील श्रीनगर युवा मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी बिलाडी गाव नजीक असलेल्या धरणावर गेले होते. यावेळी लोकेश पाटील हा घरातील गणरायाची मूर्ती विसर्जित करीत असताना त्याचा खोल पाण्यात तोल गेला. त्यामुळे तो गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब निदर्शनास आल्याने त्याचा भाऊ चैतन्य पाटील याने पाण्यात ऊडी टाकली. त्याने लोकेश याला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही बुडत असल्याचे पाहून गावातील आणखी तिघां तरुणांनी पाण्यात उतरून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र ते देखील खोल पाण्यात जाऊ लागल्याने अन्य लोकांनी तिघांना बाहेर काढले. मात्र चैतन्य आणि लोकेश तोपर्यंत पाण्यात बुडाले होते. सार्वजनिक गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी या दोघांना देखील बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले .
यातील चैतन्य सुनील पाटील हा अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी होता. तर लोकेश सुनील पाटील हा इयत्ता बारावीचा विद्यार्थी होता. सुनील पाटील हे बिलाडी येथेच शेती व्यवसायावर आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. त्यांना ही दोनच मुले होती. दोनही मुले अभ्यासू होती. तर आई-वडिलांच्या नेहमीच्या शेतीच्या कामात देखील त्यांचा हातभार लागत होता. काल गणरायाला निरोप देण्यासाठी संपूर्ण पाटील कुटुंब धरणावर उपस्थित होते .गणरायाच्या घोषणा देतच आपली मुले ही पाण्यामध्ये विसर्जनासाठी गेल्याचे आई-वडील डोळ्यांनी पाहत होते. मात्र मुले गटांगळ्या खाऊन पाण्यात दिसेनाशी झाल्यामुळे सुनील पाटील आणि परिवाराने हंबरडा फोडला. आपल्या डोळ्या देखत दोनही मुलांचा अशा पद्धतीने अंत झाल्याचे पाहून त्यांच्या दुःखाचा पारावार उरला नाही. अखेर सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दोघ निपचित झालेल्या पाटील बंधूंना बाहेर काढले. यावेळी सुनील पाटील आणि त्यांच्या परिवारांचा आक्रोश हा प्रत्येकाचे मनाला हात घालून गेला. दरम्यान या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या दोन्ही भावांचे शवविच्छेदन करून त्यांच्या परिवाराला मृतदेह आज सकाळी सोपवण्यात आले. यानंतर बिलाडी गावातच सोबत दोघांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या घटनेमुळे बिलाडी गावावर एकच शोककळा पसरली आहे.