इलेक्ट्रिक बसेस File photo
नाशिक

Nashik AC Electric Buses | नाशिकच्या रस्त्यांवर 1 सप्टेंबरपासून धावणार वातानुकूलित ई - बसेस

नाशिकच्या रस्त्यांवर 1 सप्टेंबरपासून धावणार वातानुकूलित ई - बसेस

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : केंद्र सरकारच्या 'पीएम ई-बस' योजनेंतर्गत नाशिक महापालिकेला मंजूर झालेल्या ५० इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या टप्प्यात २१ वातानुकूलित ई - बसेस शहरात दाखल झाल्या आहेत. पुढील आठवड्यात आणखी सात बसेस दाखल होणार असून, त्यामुळे १ सप्टेंबरपासून नाशिककरांना २८ वातानुकूलित ई-बसेसमधून प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिटीलिकच्या ताफ्यात पर्यावरणपूरक बसेसची भर पडल्याने शहर बससेवेला मोठा दिलासा मिळणार आहे.

महापालिकेने नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकची स्थापना करून २०२१ पासून शहर बससेवा सुरू केली. सध्या सिटीलिंकच्या ताफ्यात सुमारे २५० बसेस असून, त्यात २०० सीएनजी आणि ५० डिझेल बसेसचा समावेश आहे. पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी सुरुवातीला केंद्राच्या 'एन कॅप' योजनेंतर्गत ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा प्रस्ताव होता. त्यानंतर केंद्र सरकारने 'पीएम ई बस' योजनेंतर्गत नाशिक महापालिकेला १०० ई- बसेस देण्याचा निर्णय घेतला. त्यातील पहिल्या टप्प्यात ५० बसेस मंजूर केल्या.

नाशिकसाठी ऑपरेटर कंपनी म्हणून 'जेबीएम इकोलाइफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड'ची नियुक्ती केली आहे. मात्र, या कंपनीसोबतचा करार रखडल्याने ई बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्यास विलंब झाला. आडगाव येथील ई बस डेपोचे काम पूर्ण होऊन तीन महिने उलटूनही करार झाला नसल्याने ई- बसेस सेवेला मुहूर्त मिळत नव्हता.

शासनाकडून कराराचा मसुदा अंतिम होण्यास विलंब झाल्याने ही प्रक्रिया लांबली होती. अखेर गेल्या महिन्यात महापालिका मुख्यालयात महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या उपस्थितीत महापालिका व कंपनीमध्ये करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यानंतर ई-बसेस दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ई - बसेसचा रंग केशरी

नव्याने दाखल झालेल्या ई- बसेसचा रंग बदलला असून, या बसेस केशरी रंगाच्या आहेत. सध्या २५० बसेसच्या ताफ्यात ५० ई बसेसची भर पडणार असल्याने सिंहस्थापूर्वी सिटीलिकची प्रवासी वाहतूक क्षमता वाढणार आहे. इलेक्ट्रिक बसेसमुळे डिझेलवरील खर्चात बचत होण्यासोबतच कार्बन उत्सर्जन आणि वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्यावरणपूरक दिशा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT