नाशिक

नाशिक : झेडपीच्या रद्द झालेल्या पदभरती शुल्क परतीसाठी आता आधारची आवश्यकता

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मार्च 2019 व ऑगस्ट 2021 मध्ये 34 जिल्हा परिषदांत रद्द करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार असून, संबंधित उमेदवारांनी आधार क्रमांकावर आधारित माहिती वेबपोर्टलवर सादर करण्याचे आवाहन ग्रामविकास विभागाने केले आहे.

संबधित बातम्या :

शुल्क परत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेताना वेबपोर्टलवर उमेदवारांकडून संपूर्ण माहिती मागवली जात आहेत. यामध्ये यूजर आयडी महत्त्वाचा होता. मात्र चार वर्षांपूर्वी भरलेल्या अर्जाचा यूजर आयडीच्या नोंदी आपल्याकडे नसल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्याने ग्रामविकास विभागाने आधार क्रमांकावर आधारित माहिती मागितली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना अर्ज करणे सोपे होत आहे. परीक्षा शुल्क संबंधित उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी https://mahardda.com या संकेतस्थळावर लिंक सुरू केली आहे.

राज्य शासनाच्या वतीने मार्च 2019 व ऑगस्ट 2021 मध्ये 34 जिल्हा परिषदांमधील पदांची भरतीप्रक्रिया राबवली होती. मात्र, या परीक्षानंतर रद्द करण्यात आल्या. राज्यातील 2 लाख 38 हजार 380 पेक्षा अधिक उमेदवारांचे तब्बल 21 कोटी 70 लाख रुपये परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेसाठी 18 हजार 866 अर्जदारांचे सुमारे 1 कोटी 71 लाख रुपये परत केले जाणार आहे.

राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या गट-क मधील 18 संवर्गातील पदांसाठी मार्च 2019 मध्ये ग्रामविकास विभागाने जाहिरात प्रसिध्द केली होती. या परीक्षा महापरीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येणार होत्या. तसेच ऑगस्ट 2021 मध्ये जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाची पाच संवर्गातील रिक्तपदांसाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. या भरतीप्रक्रियेत आकृतिबंध निश्चित करताना दिव्यांगांच्या जागा निश्चित करण्यात आल्या नव्हत्या. तसेच महापरीक्षेच्या कामकाजातील त्रुटी आणि त्यांनी नेमलेली न्यासा ही त्रयस्थ संस्थादेखील नियमबाह्य ठरली होती. विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडत भरतीप्रक्रियेला आक्षेप घेतले होते. भरतीप्रक्रियेस झालेला उशीर व राज्य सरकारने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नवीन भरतीप्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतल्याने 21 ऑक्टोबर 2022 रोजी ही भरतीप्रक्रिया रद्द केली. या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने 11 एप्रिलला 34 जिल्हा परिषदांना ही रक्कम परत करण्यासाठी मान्यता दिली होती. त्यानुसार कोकण विभागाच्या उपायुक्तांनी सर्व जिल्हा परिषदांना 21 कोटी 70 लाख 64 हजार 422 रुपये परत केले आहेत. परीक्षा शुल्क संबंधित उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी https://mahardda.com या संकेतस्थळावर लिंक सुरू केली आहे. याबाबत सर्व जिल्हा परिषदांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या माहितीची पडताळणी करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी, असे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT