नाशिक महापालिकेसह विविध शासकीय विभागांकडून तयार करण्यात आलेल्या सिंहस्थ आराखड्याविषयी आढावा बैठक मंगळवारी (दि. 31) राज्याच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत होत आहे. Pudhari News network
नाशिक

Nashik | सिंहस्थ आराखडा 7,500 कोटींवर जाणार; प्रधान सचिव घेणार आज आढावा

सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत आज बैठक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर महापालिकेसह विविध शासकीय विभागांकडून तयार करण्यात आलेल्या सिंहस्थ आराखड्याविषयी आढावा बैठक मंगळवारी (दि. 31) राज्याच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत होत आहे. महापालिकेने सिंहस्थासाठी तयार केलेल्या 15 हजार कोटींच्या आराखड्यात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचनेनंतर तब्बल 8,100 कोटींची कपात करून 6,900 कोटींवर आराखडा आणल्यानंतर आता पुन्हा 600 कोटींची सुधारित अंदाजपत्रकीय बदलानुसार वाढ केली जाणार आहे. त्यानुसार आता हा आराखडा 7,500 कोटींपर्यंत जाणार आहे.

आगामी कुंभमेळ्यासाठी महापालिकेने 15 हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला होता. यात रिंगरोड व भूसंपादनासाठी 4 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालय राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच अन्य राज्यस्तरीय यंत्रणांनाही कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकासकामे करावी लागत असल्यामुळे हा आराखडा जवळपास 23 ते 24 हजार कोटींच्या घरात जाणार होता. अधिकाधिक निधी मागितला म्हणजे केंद्र व राज्य शासन कपात करून किमान पोट भरेल इतका निधी देईल, अशी अपेक्षा करून आराखड्यातील खर्चाचे आकडे फुगवले होते. वास्तविक सन 2015 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेला जेमतेम 1,052 कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला होता. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी बैठकांचे सत्र लावत महापालिकेचा 15,000 कोटींचा आराखडा 6,900 कोटींवर आणला आहे. आता यात 600 कोटी रुपयांची कामे वाढविली जात आहेत. सिंहस्थ आराखड्यासंदर्भात प्रधान सचिवांनी मंगळवारी (दि.31) बैठक बोलाविली असून, त्यात या आराखड्याविषयी चर्चा केली जाणार आहे.

अधिकाऱ्यांचा थर्टी फर्स्ट महापालिकेतच

एरवी वर्षाचा शेवट अर्थात थर्टी फर्स्टला अनेक जण सहकुटुंब सहलीला जातात. महापालिकेचे काही अधिकारीही सहलीत सहभागी होतात. यंदा अधिकाऱ्यांचा थर्टी फर्स्ट मात्र आकडेमोड करण्यातच जाणार आहे. विभागाची माहिती अद्ययावत करून देणे तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पीपीटी प्रेझेंटेशन तयार करणे यासाठी अधिकाऱ्यांचा थर्टी फर्स्ट महापालिकेतच सरणार आहे.

महापालिकेने सिंहस्थासाठी ६,९०० कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यात काही कामांचा समावेश केला जाणार असून, आराखडा ७,५०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
संजय अग्रवाल, शहर अभियंता. नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT