

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविक व पर्यटकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला 224 डॉक्टर्ससह तब्बल एक हजार अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून, कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात ही भरती केली जाणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. महापालिकेने विविध विभागांचा सात हजार कोटींचा एकत्रित प्रारूप सिंहस्थ आराखडा जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. त्यात वैद्यकीय विभागाच्या आराखड्याचाही समावेश आहे. सिंहस्थातील मुख्य पर्वणी व इतर कालावधीकरिता शहरात सुमारे पाच कोटी इतके भाविक, पर्यटक तसेच साधू- महंत येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना सिंहस्थकाळात आरोग्य - वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेच्या वैद्यकीय विभागावर आहे. सद्यस्थितीत आरोग्य वैद्यकीय विभागाकडे 326 इतके मनुष्यबळ आहे. यात एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी 36, तर 102 स्टाफ नर्स आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय अतांत्रिक कर्मचारी 170 असून, मिश्रक 17 आणि एएनएम एक असे संख्याबळ आहे. 2015-2016 मध्ये झालेल्या सिंहस्थासाठी 446 इतके मनुष्यबळ आउटसोर्सिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते. 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या अनुषंगाने वैद्यकीय विभागाने 1,018 इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाचा प्रस्ताव तयार केला असून, तशी मागणी सिंहस्थ आराखड्यांतर्गत केली आहे.
सिंहस्थासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाच्या आराखड्यानुसार विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी- 38, एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी- 61, बीएएमएस वैद्यकीय अधिकारी- 125, स्टाफ नर्स- 193, एएनएम- 150, मिश्रक - 125, वैद्यकीय अतांत्रिक - 326 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. इतके अतिरिक्त मनुष्यबळ मिळाल्यास मुख्य सिंहस्थ कालावधीत त्यावर 11 कोटी 25 लाख रुपये खर्च होणार आहे.
मलेरिया विभागासाठी सिंहस्थकाळात विविध बाबींवर खर्च करण्यासाठी सहा कोटी 66 लाख रुपये खर्चाचा समावेश आराखड्यात आहे. यात डास प्रतिबंधात्मक अळीनाशक व कीटकनाशक खरेदी - तीन कोटी, डेंग्यू जनजागरण मोहीम - 20 लाख, नपसॅक औषध फवारणी पंप - 20 लाख, पाॅवर स्प्रे अळीनाशक फवारणी यंत्र (10 नग) तीन लाख, व्हेईकल माउटेड फॉगिंग मशीन (10 नग) 75 लाख, हॅण्ड फॉगिंग मशीन (30 नग)- 30 लाख, पर्यवेक्षणासाठी व जनजागृतीसाठी वाहने (तीन नग) - 25 लाख, कंत्राटी मनुष्यबळ (150 मनुष्य सहा महिन्यांकरिता) एक कोटी 90 लाख, किरकोळ साहित्य - तीन लाख.