Nashik 11th admission  file photo
नाशिक

Nashik 11th admission | ११ वी प्रवेशाला प्रारंभ, २६ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी

११ वी प्रवेशाला प्रारंभ, नाशिक विभागात २.१७ लाख जागा, १८ मेपासून शून्य फेरी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी धावपळ सुरू केली आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांत एकूण २ लाख १७ हजार ९४५ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापैकी नाशिक शहरात १ लाख ६ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी सुरू केली असून, राज्यभरातून आतापर्यंत ७ लाख ७४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग-१ भरून नोंदणी पूर्ण केली आहे. शहरी व ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या क्षमतेनुसार प्रवेश मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. शहरी भागातील स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयांसाठी १००, तर वरिष्ठ संलग्न महाविद्यालयांसाठी १२० विद्यार्थ्यांची क्षमता निश्चित करण्यात आली आहे.

अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी देताना भौतिक सुविधांची तपासणी करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. प्रवेशप्रक्रियेत शून्य फेरीसह तीन नियमित फेऱ्या आणि कोटा प्रवेशाचा समावेश राहणार आहे.

विद्यार्थ्यांना किमान एक ते कमाल दहा महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येणार आहेत. तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर दाखले वेळेत सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

अर्जाचा भाग-१ व भाग-२ काळजीपूर्वक भरावा चुकीची माहिती आढळल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो तांत्रिक मदतीसाठी महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन केंद्रे सुरू आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत

अशी होणार प्रवेशप्रक्रिया

१८ ते २० मे : शून्य फेरी प्रक्रिया

२१ ते २२ मे: भाग-२ भरणे व पसंतीक्रम निश्चिती

२६ मे : पहिली गुणवत्ता यादी जाहीर

२६ ते २८ मे : प्रवेश निश्चिती प्रक्रिया

२९ मे रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध

३० मे : दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT