नाशिक : लष्करातील सेवानिवृत्त कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याची तब्बल ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. देवळाली कॅम्प येथील 'हरी निकेतन' या गृहप्रकल्पातील फ्लॅटची परस्पर विक्री व त्यावर बेकायदेशीररीत्या कर्ज काढण्याच्या प्रकरणी त्याला २ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
कारडा इन्फ्रास्ट्रक्चरचे डायरेक्टर नरेश कारडा यांनी २०१९ साली देवळाली कॅम्प, संसरी गाव येथे 'हरी निकेतन फेज २' नावाचा पाच इमारतींचा प्रकल्प उभारला. फ्लॅटधारकांनी पूर्ण पेमेंट करून ताबा घेतला असतानाही कारडा यांनी त्यांना खरेदीखत तयार करून दिले नाही. याउलट, सदर मिळकतीवर स्वतःचा मालकीहक्क दर्शवून त्यांनी कॅप्रीग्लोबल या आर्थिक संस्थेशी संगनमत करून संपूर्ण प्रकल्प बेकायदेशीररीत्या गहाण ठेवला आणि त्यांच्याकडून २३ कोटी रुपये कर्ज घेतले.
कर्जाची परतफेड न झाल्याने कॅप्रीग्लोबलने संबंधित मिळकतीचा जाहीर लिलाव करण्याच्या नोटीस फ्लॅटधारकांना दिली. हा धक्कादायक प्रकार उघड होताच फ्लॅटधारकांनी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. कर्नल विक्रम दिलीपकुमार आदित्य यांच्या तक्रारीवरून नरेश जगुमल कारडा यांच्यासह कारडा इन्फ्रास्ट्रक्चरचे इतर ९ जण व कॅप्रीग्लोबल या आर्थिक संस्थेविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने नरेश कारडा यांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. सुनावणीत न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.