

नाशिक : सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण प्रकाश लोंढे व प्रिन्स सिंग यांना नेपाळ बॉर्डर येथून क्राइम ब्रांच युनिट -२ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सहाय्यक गुन्हे शाखा युनिट -२ च्या पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान हिरे व त्यांचे पथक जवळपास २० दिवसापासून त्यांच्या मागावर होते. या घटनेतील नाशिक पोलिस आयुक्तालयास मोठे यश मिळाले आहे.
या अगोदरही दोन वेळा त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, ते निसटले होते. बागपत व राजस्थान या दोन्ही ठिकाणांहून पळण्यात ते यशस्वी झाले होते. त्यादरम्यान राहुल गायकवाड व वेदांत चाळगे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी राहुल गायकवाड याचा भिंतीवरून उडी मारताना त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. भूषण लोंढे, राहुल गायकवाड, प्रिन्स सिंग व वेदांत चाळगे एकाच खोलीत राहत होते. पोलिस येणार अशी कुणकुण लागतात भूषण लोंढे व प्रिन्स सिंग तेथून फरार झाले. तेथून ते हरियाणा येथे गेल्याचा पोलिसांना संशय होता. तेव्हापासून पोलिस पथक मागावर होते.
नेपाळ येथे सीमा ओलांडताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. सातपूर नाईस हाऊसजवळील औरा बारमध्ये ५ ऑक्टोबरला पहाटे गोळीबाराची घटना घडली. यात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार व अमोल पगारे यांना सहआरोपी करण्यात आले. हॉटेल मालक बिपिन पटेल व संजय शर्मा यांचे ६ ऑक्टोबरला अपहरण करण्याचा गुन्हा सुद्धा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. अंबड येथील बंगला बळकवल्याप्रकरणात खंडणी व जीवे मारण्याची धमकीचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला. त्यांच्यावर दहाहून अधिक अपहरण, खंडणी, जीवे मारण्याची धमकी, जमीन बळकावणे असे गंभीर गुन्ह्यांत भूषण लोंढे व प्रिन्स सिंग पोलिसांना हवे हाेते. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्याचा मुलगा दीपक लोंढे यांच्यासह इतर आरोपी मध्यवर्ती कारागृहात आहे.
.... कायद्याचा बालेकिल्ला मोहिमेची सुरुवात
नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारांविरोधात सुरू केलेली ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ ही मोहीम याच सातपूर गोळीबार प्रकरणापासून सुरुवात झाली होती. या दोघांच्या अटकेमुळे या प्रकरणातील आता सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
दुहेरी हत्याकांडात अनेक वर्ष कारागृहात
भूषण लोंढे व प्रिन्स सिंग दोघेही सातपूरच्या दुहेरी हत्याकांडात अनेक वर्ष कारागृहात होते. मात्र, त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. ही घटना घडल्यानंतर अनेक वर्ष हे दोघे एकत्रच फरारी होते. पुणे येथे एका जीममध्ये व्यायाम करत असताना पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या पथकाने त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले होते.
अटकेत असलेले आरोपींची नावे अशी...
प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे, प्रिन्स सिंग, राहुल गायकवाड, वेदांत चाळगे, सनी विठ्ठलकर, निखिल निकुंभ, शुभम पाटील, दुर्गेश वाघमारे, अभिजीत अडांगळे व शुभम निकम हे सर्व तुरुंगात आहेत.