Raksha Bandhan Muhurat Time 2025
नाशिक : श्रावण महिन्यामध्ये पंचांगानुसार नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण साधारण एकाच दिवशी येतात. यंदा मात्र, दोन्ही सण हे वेगवेगळ्या दिवशी साजरे होणार आहेत. यंदा नारळी पौर्णिमा शुक्रवारी (दि.8) असून, बहीण-भावाच्या प्रेमाचा रक्षाबंधन सण शनिवारी (दि. 9) उत्साहात साजरा केला जाणार आहे.
रक्षाबंधन हा भावंडांच्या प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा भावनिक व धार्मिक महत्त्वाचा सण असून, यानिमित्ताने शहरातील दुकाने विविध राख्यांनी सजली असून, महिला वर्ग खरेदीसाठी उत्सुक दिसत आहे. यानिमित्ताने, शहर आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये राख्या, मिठाई आणि भेटवस्तूंची दुकाने सजली आहेत. यंदा पौर्णिमेची सुरुवात 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी होणार आहे.
पंचांगानुसार, जर एखाद्या श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसर्या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते. यावर्षी असाच योग जुळून आला आहे.
ही पौर्णिमा दुसर्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 29 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे दोन दिवसांच्या पौर्णिमेचा योग जुळून आला आहे. पंचांगानुसार, उदय तिथी मान्यतेनुसार रक्षाबंधन शनिवारी साजरी होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी अनेक शुभमुहूर्त आहेत. या दिवशी ‘सर्वार्थ सिद्धी योग’ आणि ‘सौभाग्य योग’ असे दोन शुभ योग तयार होत आहेत. हे दोन्ही योग अत्यंत शुभ मानले जातात.