पुणे : रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीला दरवर्षी मोठी गर्दी असते, त्यामुळे पीएमपीकडून ताफ्यातील जादा गाड्या मार्गावर सोडल्या जातात. यंदाही पीएमपी प्रशासनाने 1 हजार 995 म्हणजेच जवळपास 2 हजार गाड्या रक्षाबंधनाच्या दिवशी मार्गावर उतरवण्याचे नियोजन केले आहे. (Pune Latest News)
पुणे, पिंपरी-चिंचवड, उपनगरे व ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. 9) रोजी मार्गावर संचलनात असणार्या दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय दिनांक 8, 9, 10 व 11 ऑगस्ट 2025 या दिवशीही जादा बसचे नियोजन केले आहे.
दैनंदिन 1 हजार 922 बसव्यतिरिक्त जादा 73 बस, अशा एकूण 1 हजार 995 बस पीएमपीकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याकरिता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.