boys sexual abuse victims 
नाशिक

Minor Boy Abuse Case | नंदुरबारमध्ये धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुले अन् तरुणांचे लैंगिक शोषण करणाऱ्या चेतन कोळीला अटक

Minor Boy Abuse Case | नंदुरबारमध्ये धक्कादायक प्रकार : संशयित तरुणाकडून व्हिडिओ क्लिप्स जप्त

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन बालकांसह युवकांचे लैंगिक शोषण करत एका तरुणाने या कृत्याचे अनेक व्हिडिओ बनविल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी २२ वर्षीय संशयितावर लक्ष ठेवले असता त्याने शुक्रवारी (दि. ७) मध्यरात्रीनंतर भोणे फाटा परिसरातील शेतात एका अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून भेटण्यासाठी बोलावले होते.

त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ वरिष्ठांना कळवून विशेष पथक कारवाईसाठी रवाना केले. संशयित घटनास्थळी येताच पोलिसांनी घेराव घालत त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने त्याचे नाव चेतन प्रकाश कोळी (२२ रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) असे सांगितले. संशयितास नंदुरबार शहर ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात गुप्त फोल्डरमध्ये अल्पवयीन बालके व युवकांवरील लैंगिक अत्याचारांचे अनेक अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे आढळून आली.

सदरचे व्हिडिओ व छायाचित्रे हे फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, याबाबत पोलीस कर्मचारी रूपेश पगारे यांनी सरकारतर्फे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयित चेतन कोळी याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचारासह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली.

व्हिडिओ क्लिप्सबाबत तपासणी सुरू

संशयित कोळी गरीब कुटुंबातील असून, त्याचे वडील रेल्वे डब्यांत वडे विक्रीचे काम करतात तर, आई स्वयंपाकाची कामे करते. संशयित चेतन हा मूर्ती विकणे, सजवणे अशा कामातून घरी हातभार लावत असे.

दरम्यान, त्याने कोणकोणत्या मुलांवर अत्याचार केले आहेत. त्याच्याकडील क्लिप्सची सत्यता आणि एकंदरीत किती क्लिप्स आहेत याचा सखोल तपास सुरू असून, फॉरेन्सिक तपासानंतरच क्लिप्सची संख्या किती याबाबत सांगता येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी

प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, भाजपच्या उमा चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे यांनी निषेध नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रतिभा शिंदे यांनी फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून प्रकरणाची सुनावणी करण्याची मागणी केली आहे.

पिडीतांची ओळख पटविण्याचे काम सुरू

प्राथमिक तपासात संशयित हा २०२२ पासून अल्पवयीन बालके व समवयस्क युवकांना लक्ष्य करून पैशांचे आमिष दाखवून त्यांचे शोषण करीत असल्याचे तसेच तो या कृत्याचे व्हिडिओ व छायाचित्रे बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितांवर सातत्याने अत्याचार करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पीडितांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT