Tribal Students 
नाशिक

Tribal Students | आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला नवी दिशा; नंदुरबारच्या 30 आश्रमशाळांत 'भविष्यातील अधिकारी' परीक्षा संपन्न

Tribal Students | नंदुरबारच्या ३० आश्रमशाळांमध्ये झाली 'भविष्यातील अधिकारी' ऑनलाइन गुणवत्ता शोध चाचणी

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यात स्पर्धा परीक्षाविषयी आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली 'भविष्यातील अधिकारी' ऑनलाइन गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व ३० आश्रमशाळांत यशस्वीरीत्या पार पडली. ६ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा अनुभव मिळाला.

आदिवासी विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक आव्हानांसाठी तयार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे. नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे नियोजन करण्यात आले. सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) देवेंद्र पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) एन. एम. साबळे आणि प्रभारी सहायक प्रकल्प अधिकारी योगेश बागल यांच्या समन्वयातून परीक्षा प्रक्रिया राबवण्यात आली.

शिक्षण विस्तार अधिकारी डी. एच. माळी, व्ही. व्ही. सोनार, एस. एस. पाटील, बी. ए. आडळख, पी. एम. वसवे आणि आर. एन. निकम यांनी परीक्षेच्या आयोजनासाठी मार्गदर्शन केले. संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

ऑनलाइन परिक्षेतून जगाची ओळख

  • आजच्या डिजिटल युगात स्पर्धा परीक्षांची तयारी करताना संगणकीय ज्ञान, अचूक निर्णयक्षमता, वेळेचे नियोजन आणि ताार्किक विचारशक्ती या बाबींना विशेष महत्त्व आहे. 'भविष्यातील अधिकारी' गुणवत्ता शोध चाचणीच्या माध्यमातून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना या कौशल्यांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. ऑनलाइन परीक्षा देताना प्रश्नांचे आकलन करणे, उपलब्ध वेळेत उत्तरे निवडणे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अशा बाबींचा सराव विद्यार्थ्यांना करता आला. त्यामुळे भविष्यात विविध स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची ओळख करून त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

  • आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शैक्षणिक साधने आणि स्पर्धात्मक परीक्षांची संधी उपलब्ध व्हावी, या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि गुणवत्तेला प्रोत्साहन मिळाल्यास हे विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळू शकतात.

दैनिक 'पुढारी'चे मोलाचे योगदान

  • या परीक्षा उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत दैनिक 'पुढारी'च्या नाशिक विभागाचे वितरण व्यवस्थापक शरद धनवे आणि आयटी सेलचे राजेंद्र गायकवाड यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. परीक्षेचे नियोजन, ताार्मिक बाबींचा समन्वय आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सहकार्य करून देण्याच्या दृष्टीने त्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि दैनिक 'पुढारी'च्या पथकातील सदस्यांच्या समन्वयातून नंदुरबार प्रकल्पातील सर्व ३० आश्रमशाळांमधील परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाली.

  • आदिवासी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नव्हे, तर स्पर्धात्मक जगतात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 'भविष्यातील अधिकारी' या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशा उपक्रमांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

"आदिवासी विद्यार्थ्यांत गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि जिद्दीची कमतरता नाही. त्यांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. 'भविष्यातील अधिकारी' ऑनलाइन गुणवत्ता शोध चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक स्पर्धा परीक्षांची ओळख आणि आत्मविश्वाला चालना मिळणार आहे. भविष्यात या अनुषभावा विद्यार्थ्यांच्या निश्चित फायदा होईल. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे सर्व अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि दैनिक 'पुढारी'चे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आदिवासी विद्यार्थींनी शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्थाने पाहावीत आणि भविष्यात प्रशासनिक सेवेस क्षेत्रात अधिकारी बनून समाज्याच्या विकासात योगदान द्यावे, हाच उद्देश आहे."
— चंद्रकांत पवार, प्रकल्प अधिकारी, नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT