Nakushi Tarihi Havi Havi Shi : दिलासादायक ! नाशिकमध्ये 'नकोशी' झाली हवीहवीशी!  Pudhari File Photo
नाशिक

Nakushi Tarihi Havi Havi Shi : दिलासादायक ! नाशिकमध्ये 'नकोशी' झाली हवीहवीशी!

पुढारी विशेष ! शुभवर्तमान : मुलींचा जन्मदर 923 पर्यंत वाढला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आसिफ सय्यद

गर्भलिंगनिदान कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या जनजागृतीच्या प्रयत्नांना काहीसे यश मिळू लागले आहे. गेल्यावर्षी दर हजार मुलांच्या तुलनेत ८८७ पर्यंत खाली घसरलेला मुलींचा जन्मदर आता वाढू लागल्याचे आशादायक चित्र आहे. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या दर हजार मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर ९२३ पर्यंत वाढला आहे. त्यामुळे 'नकोशी' आता हवीहवीशी वाटू लागल्याचा सकारात्मक संदेश यातून मिळाला आहे.

महात्मानगर सारख्या उच्चभ्रू वस्तीत अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचा प्रकार सप्टेंबर २०२४ मध्ये उघडकीस आला होता. पंड्या हॉस्पिटलमध्ये हे अवैध गर्भपात केंद्र सुरू होते. एका माता मृत्यूच्या चौकशी दरम्यान महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत हा धक्कादायक खुलासा झाला होता. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्भपाताच्या औषधांचा साठाही आढळून आल्याने नाशिकमध्ये स्त्री भ्रूण हत्या होत असल्याचा संशय बळावला होता. किंबहुना गेल्या वर्षभरात शहरातील मुलींचा घटलेला जन्मदर धडकी भरावणारा होता.

गर्भलिंगनिदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सोनोग्राफी केंद्रांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही छुप्या पध्दतीने गर्भलिंग निदान होत असल्याचे मुलींच्या घटलेल्या जन्मदराच्या आकडेवारीवरून समोर आल्याने महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विभागामार्फत गर्भलिंगनिदान कायद्याच्या तरतुदींची कठोर अंमलबजावणी सुरू केली गेली. सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी सुरू केली. त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा दिला गेला. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याबाबत जनजागृतीही केली गेली. त्याचा परिपाक म्हणून महापालिका क्षेत्रातील मुलींचा जन्मदर वाढू लागला आहे.

गेल्यावर्षी मुलींचा जन्मदर ८८७

जानेवारी ते डिसेंबर २०२४ या गेल्या वर्षभरात शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये १२ हजार २४२ मुलगे जन्माला आले. त्यातुलनेत केवळ १० हजार ८६३ मुलींचा जन्म झाला. दर हजार मुलांमागे मुलींचा हा जन्मदर ८८७ इतका होता. विशेष म्हणजे सप्टेंबर २०२४ महिन्यात मुलींचा जन्मदर हा सर्वात नीचांकी अर्थात ८१७ इतका होता. सप्टेंबर २०२५ मध्ये हाच जन्मदार मात्र ९२३ वर गेला आहे.

गर्भलिंगनिदान कायद्यानुसार स्त्रीलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांची माहिती देण्यासाठी १८००२३३४४७५ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित केंद्रावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित केंद्राची माहिती देणाऱ्यास शासनाकडून तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येते. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.
डॉ. विजय देवकर, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

असा वाढला मुलींचा जन्मदर

गर्भलिंग निदान करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर मुलींच्या जन्मदरात सुधारणा होत आहे. आॉगस्टमध्ये ७७० मुलीचा तर ८६३ मुलांचा जन्म झाला. आॉगस्ट महिन्यातील मुलींचा जन्मदर ९०३ होता. सप्टेंबर मध्ये ९३७ मुली जन्मल्या तर १०१५ मुलांचा जन्म झाला. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील मुलींचा जन्मदर ९२३ पर्यंत वाढला आहे.

सोनोग्राफी केंद्रांची १५ पासून तपासणी

गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत येत्या १५ नोव्हेंबरपासून तपासणी केली जाणार आहे. यासाठी १८ शो‌ध पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रुग्णालयांची देखील तपासणी केली जाणार असल्याचे सहाय्यक मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT