वणी (नाशिक) : वणीतील वाढते अवैध पार्किंग, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीबाबत प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज मोठ्या संख्येने शांततामोर्चा काढत ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. अलीकडेच वणी–सापुतारा महामार्गावर झालेल्या अपघातात दीपक जांभळे यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने दृष्टीआड होत असल्याने हा अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी दिवंगत जांभळे यांच्या छायाचित्रासह शांततापूर्ण पद्धतीने आपला रोष व्यक्त केला.
ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनात कॉलेज परिसर, कळवण चौफुली, देवनदी पूल आणि शहरातील प्रवेशद्वारांवर सतत अपघाताचा धोका असल्याचे नमूद केले. या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी त्यांची मागणी आहे. देवनदी पुलापासून बसस्थानकापर्यंत तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवैधरित्या पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होते. या वाहनधारकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. शहरात उभे केलेले शुभेच्छा व जाहिरात फलक वाहनांच्या दृष्टीआड होत असल्याने ते हटविण्याचीही मागणी ग्रामस्थांनी केली.
बिरसा मुंडा चौक ते ग्रामपंचायत कार्यालयादरम्यान गतिरोधक बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी तातडीने पत्रव्यवहार करावा, असा आग्रहही सरपंचांकडे धरण्यात आला. पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास रास्ता रोकोसह मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
सरपंच मधुकर भरसट आणि उपसरपंच विलास कड यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागांशी तातडीने संपर्क साधण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हेच निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे आणि किरण जगदाळे यांनी समस्यांची दखल घेऊन निवेदन स्वीकारले. नाभिक समाज मंडळासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घेतलेल्या या मोर्चामुळे वाहतूक सुधारणा तातडीने करण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे.