

वणी (नाशिक) : वणी – सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील देवनदी पुल ते महाविद्यालयाचे प्रवेशद्वार हा रस्ता दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत जात आहे. रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहने, दुकानदारांची वाढती अतिक्रमणे आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली दिसून येत आहे.
दोन दिवसांपूर्वी वाहतूकीच्या निष्काळजीपणाचा बळी ठरलेल्या अपघातात दीपक श्रीधर जांभळे (४५) यांचा मृत्यू झाला. गुरुवार, दि. ४ डिसेंबरला दुपारी ते मेडिकलमधून औषधे घेऊन परतत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे समोरून येणारा रस्ता दिसेनासा झाला. अचानक समोर आलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नाशिकला हलविण्यात आले, मात्र शनिवार, दि. ६ डिसेंबरला उपचारादरम्यान दीपक जांभळे निधन पावले.
या मार्गावर अपघाताची मालिकाच सुरू आहे. किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, बिल्डिंग मटेरियल दुकाने आणि 24 तास चालणारे मेडिकल यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता सतत अरुंद होत आहे. वळणावरून येणारी वाहने दिसत नसल्याने धोक्याची स्थिती आणखी वाढली आहे.
पोलीस यंत्रणा निष्क्रिय
इतक्या गंभीर परिस्थितीतही पोलीस वाहतूक नियंत्रण, नाकेबंदी किंवा दंडात्मक कारवाई करताना दिसत नाहीत. नागरिकांच्या मते, पोलिसांकडून तातडीची कारवाई केली जात नाही
ग्रामपंचायतही कारवाईशून्य
रस्त्यांवर लावलेले बॅनर, फलक, स्टॉल आणि इतर अतिक्रमणे अजूनही जशास तसे आहेत. ग्रामपंचायतीने एकाही अनधिकृत बांधकामावर कारवाई केलेली नाही. परिणामी वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आहेत. अपघातांमुळे नागरिकांचा संयम सुटत असून तातडीची सुधारणा न झाल्यास गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देवनदी पुल ते काॅलेजपर्यंत रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. काही वाहनचालकांना नोटिसा दिल्या आहेत. यानंतरही नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल
गायत्री जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, वणी पोलिस ठाणे
ग्रीन फार्मा समोर उभ्या असलेल्या वाहनांमुळे झालेल्या धडकेत आमचे सदस्य दीपक जांभळे यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण मार्गावरील अडचणीबाबत आम्ही पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देणार आहोत.
जगदिश सोनवणे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ, नाशिक