मेशी : नागीण नाला ते मेशी पोटचारीचे काम प्रगतिपथावर आहे. यामुळे सुमारे सव्वाशे हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे. उमराणे बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत देवरे व ग्रामस्थांनी या कामाची पाहणी केली.
चणकापूर उजव्या वाढीव कालव्यातून नागीण नाल्यापासून ते मेशी पाझरतलाव नंबर १ येथे पाणी टाकण्यासाठी पोटचारीच्या (पीडीएन) कामासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी अठरा कोटी रुपये मंजूर केले. या कामाचे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी उद्घाटन झाले. परिसरातील दुष्काळी गावांना कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करून या परिसरातील शेतीसिंचनात वाढ करण्याचा मानस आमदार डॉ. आहेर यांचा आहे. त्यामुळे कामास जलदगतीने सुरुवात झाली.
या कामामुळे पिंपळगाव, मेशी, खडकतळे, डोंगरगाव, महात्मा फुलेनगर या गावांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जवळपास ११९ हेक्टर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या कामाची उमराणे बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत देवरे, पिंपळगावचे नदीश थोरात, विनायक वाघ, खडकतळेचे माजी सरपंच पोपट पगार, तुषार शिरसाठ यांसह ग्रामस्थांनी पाहणी करत कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
तसेच ज्या गावांना किंवा ज्या शिवारात पाणी जाणे शक्य नाही अशा ठिकाणी सोलर सिस्टीम बसविण्यात येऊन २५ अशवशक्तीचे पंप बसविण्यात येऊन लिफ्टद्वारे पाणी पोहोच करण्यात येणार असल्याचे देवरे यांनी यावेळी सांगितले.
पोटचारीचे काम प्रगतिपथावर 66 आहे. बंदिस्त पाइपलाइनने पाणी जाईल. तरी जागोजागी गेट असतील. उजव्या कालव्याने वंचित क्षेत्र ओलिताखाली आणणे आमदार डॉ. आहेर यांचे स्वप्न साकार होणार आहे.प्रशांत देवरे, माजी सभापती कृउबा, उमराणे