ठळक मुद्दे
अवसायनात निघालेल्या संस्थेकडून कांदा खरेदी सुरू झाल्याचे उघड
'नाफेड'च्या नाशिक कार्यालयामार्फत या संदर्भातील प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे
नाफेड'ने विधिज्ञांमार्फत कायदेशीर सल्ला घेऊन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
नाशिक : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत कांद्याची साठवणूक करण्यासाठी 'नाफेड'ने निवडलेल्या पिंपळगाव बसवंत येथील अवसायनात निघालेल्या बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्थेकडून कांदा खरेदी सुरू झाल्याचे उघड झाले होते. यावर संबंधित संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 'नाफेड'च्या नाशिक कार्यालयामार्फत या संदर्भातील प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यास परवानगी मिळताच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक शाखेचे प्रमुख आर. एम. पटनायक यांनी दिली.
भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ (नाफेड) मार्फत यंदा एक लाख ४३ हजार टन कांद्याची खरेदी झाली. त्यातील ९५ टक्के कांदा खरेदी ही नाशिक जिल्ह्यातून झाली. यात अवसायनात निघालेल्या बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्थेकडून कांदा खरेदी सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर चौकशी केली असता, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अन्वये नोंदविण्यात आलेली असून, ही संस्था या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येते. शासन आदेशाचे उल्लंघन करून कामकाज झाल्यामुळे दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी ही संस्था अवसायनात निघाली. संस्थेवर प्रशासक नियुक्त केले आहेत, तरी त्यांच्याकडून 'नाफेड'ने कांदा खरेदी केल्याचे निर्देशनास आले. त्यावर, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी 'नाफेड'ला या संस्थेसंदर्भात नोटीस बजावली होती. त्यानंतर 'नाफेड'ने संबंधित संस्थेवर कारवाई करून कांदा खरेदी तत्काळ थांबवून गोडाऊनबाहेर दिवस - रात्र सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. तसेच 'नाफेड'ने विधिज्ञांमार्फत कायदेशीर सल्ला घेऊन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईने संबंधित संस्था अडचणीत सापडली आहे.
बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्थेने ऑनलाइन सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना परवानगी देण्यात आली. त्यांच्याविषयी तक्रार प्राप्त होताच आम्ही गोडाऊन सील केले. वरिष्ठ कार्यालयाकडे याचा रिपोर्ट केला असून, त्यांची परवानगी मिळताच गुन्हा दाखल करण्यात येईल.आर. एम. पटनायक, प्रमुख, 'नाफेड' नाशिक शाखा