Municipal Elections: 2,300 control units and 4,600 ballot units for voting.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असताना, प्रशासकीय तयारीही जोमात सुरू आहे. नाशिक व मालेगाव महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त मतदान यंत्रे दिली जाणार आहेत. महापालिकेसाठी २,३०० कंट्रोल युनिट, तर ४,६०० बॅलेट युनिट दिली जाणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. दि. १६ जानेवारीला मतमोजणीद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी महापालिकेच्या निवडणूक शाखेतर्फे जिल्ह्यातील सुमारे एक हजार शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांना कर्मचारी उपलब्धतेसाठी पत्र पाठविण्यात आले होते.
त्या माध्यमातून सुमारे ११ हजार कर्मचारी उपलब्ध झाले आहेत. मतदान व मतमोजणीसाठी सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार निवडणूक कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नियुक्ती आदेश बजाविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी १,५६८ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर ७०० ते ८०० मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान केंद्रांवर अखंड वीज, पंखे, पाणी, स्वतंत्र शौचालय, मतदान केंद्रावर टेबल, खुर्चा, बेंच, मतदारांना रांगेत उभे राहण्याच्या जागेवर सावलीसाठी शेड्स या सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मतदान यंत्रांसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी २,३०० कंट्रोल युनिट व ४,६०० बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. महापालिकेसाठी नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड, येवला, पेठ, चांदवड, सुरगाणा व कळवण या ११ तालुक्यांच्या तहसीलदारांकडून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व मार्करपेन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
मालेगावसाठी ९४१ कंट्रोल, तर २,००० बॅलेट युनिट
मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदानासाठी ९४१ कंट्रोल युनिट, तर २००० बॅलेट युनिट उपलब्ध करून दिली जाणार आहेत. बागलाण, मालेगाव, देवळा, नांदगाव व कळवण तहसीलदारांकडूनही ही मतदान यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.