नाशिक : शासनाने महापालिका निवडणुकांसाठी चारसदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवत, त्यानुसार प्रभागरचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. अंतिम प्रभागरचना ४ सप्टेंबरपर्यंत जाहीर होणार असून, ऑक्टोबरमध्ये आरक्षण आणि मतदार यादी प्रक्रियेसाठी मुदत देण्यात आली आहे. एकूणच प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या सुरुवातीस निवडणूक होण्याची शक्यता आहे.
प्रभागरचनेचा कार्यक्रम असा...
११ ते १६ जून - प्रगणक गटांची मांडणी करणे
१७ जून ते १० जुलै - गुगल मॅपवर प्रभाग नकाशे तयार करणे, प्रभागाच्या हद्दीवर प्रत्यक्ष पडाताळणी करून प्रारूप मसुदा तयार करणे, निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर करणे.
२२ जुलै ते ३१ जुलै - प्रारूप प्रभागरचना प्रसिद्धी व त्यावर हरकती व सूचना मागविणे.
१ ते ११ ऑगस्ट - शासननियुक्त प्राधिकृत अधिकाऱ्याने प्राप्त हरकतींवर सुनावणी घेणे.
१२ ते १८ ऑगस्ट - अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठविणे.
४ सप्टेंबर - राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेली प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे.
ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचनेच्या वादामुळे राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यासंदर्भातील याचिकांवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश शासनाला दिल्यानंतर शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका निवडणुकांसाठी चारसदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक महापालिका क्षेत्रातील १२२ सदस्य संख्या व चारसदस्यीय २९, तर तीन सदस्यीय २ अशा प्रकारे एकूण ३१ प्रभाग कायम राहणार आहेत. प्रभागरचना कायम राहणार असली, तरी आरक्षण मात्र बदलणार आहे. त्यामुळे प्रभागांतील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. चारसदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय घेताना प्रभागरचनेचा कार्यक्रमही घोषित झाला आहे. त्यानुसार ४ सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभागरचनेची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पुढील आठ दिवसांत आरक्षण सोडत काढण्यात येईल. त्यानंतर मतदारयाद्या तयार केल्या जातील. त्यावरील हरकती व सूचनांची प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर अखेरपर्यंत निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल. साधारणत: डिसेंबरअखेरीस अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होतील, असा अंदाज आहे.