

नाशिक : जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांमध्ये १ जानेवारी ते आजपर्यंत तब्बल 67 हजार 607 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. विशेष बाब म्हणजे, यामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी राबवलेल्या मतदार नोंदणी मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बोलले जात आहे.
गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, असा अंदाज व्यक्त होत होता. निवडणुकांशी संबंधित याचिकांवरील न्यायालयीन सुनावणीत जानेवारीत निकाल लागून दोन-तीन महिन्यांत निवडणुका जाहीर होतील, अशी चर्चा होती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तयारीला वेग दिला होता. यंदा निवडणुकांमध्ये चुरस अधिक असल्याने प्रत्येक उमेदवाराने आपापल्या भागात मोर्चा वळवला.
मतदारसंघ- संख्या
नांदगाव- 3163
मालेगाव मध्य- 4188
मालेगाव बाह्य- 9122
बागलाण- 3725
कळवण- 1659
चांदवड- 2666
येवला- 2915
सिन्नर- 1853
निफाड- 2370
दिंडोरी- 2073
नाशिक पूर्व- 9798
नाशिक मध्य-5995
नाशिक पश्चिम- 8233
देवळाली -7019
इगतपुरी- 2828
एकूण- 67607
शहरी भागातील प्रभाग व ग्रामीण भागातील गट-गणांमध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना ओळखून त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र, जानेवारीपासून प्रत्येक सुनावणीत निवडणुका लांबणीवर टाकणाऱ्या पुढील तारखा जाहीर होत राहिल्या, ज्यामुळे निवडणुकांबाबतची अनिश्चितता वाढली. तरीही इच्छुक उमेदवारांनी मतदार नोंदणीत कोणतीही कसूर केली नाही. याच परिश्रमांचे फलित म्हणजे गेल्या पाच महिन्यांत 67,607 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 30,787 पुरुष, 36,799 महिला आणि 21 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी भागांत नवमतदारांची नोंदणी अधिक झाली आहे. विशेषतः नाशिक शहरातील तीन आणि देवळाली विधानसभा मतदारसंघांत एकूण 31,045 नवमतदारांची नोंदणी झाली आहे.