नाशिक : बदलापूर प्रकरणानंतर राज्याच्या आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार शहरातील सोनोग्राफी व गर्भपात नाशिक वैद्यकीय केंद्राच्या तपासणीला महापालिकेच्या विभागाने वेग दिला आहे. महापालिका क्षेत्रातील ४२७सोनोग्राफी केंद्रापैकी ३८० केंद्रांची तपासणी वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात आली असून, यात कुठलाही गैरप्रकार आढळून आला नसल्याची माहिती सहा. वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या महात्मानगर परिसरातील पंड्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपाताचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरणात मुंबईनाका येथील मालती आयव्हीएफ सेंटरचा सहभाग असल्याचे समोर आले. यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने महापालिका आयुक्तांना निर्देश देत शहरातील सर्व १२१ गर्भपात केंद्रे आणि ४२७सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार महापालिकेने सहाही विभागीय कार्यालयांच्या स्तरावर सहा भरारी पथके स्थापन करत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची तपासणी सुरू केली. आतापर्यंत ३८० केंद्रांच्या तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात एकाही केंद्रात संशयास्पद प्रकार आढळला नसल्याचे डॉ. धनेश्वर यांनी सांगितले.
महापालिकेच्या वैद्यकीय पथकांमार्फत सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जात आहे. यात सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची नोंदणी, मशीन खरेदी व नोंदणी तसेच इतरही सर्व रेकॉर्डची तपासणी करण्यात येत आहे. सोनोग्राफी केंद्रांवर आलेल्या गर्भवती मातेची सर्व माहिती एफ अर्जात भरली जाते. या एफ अर्जात ही माहिती भरली गेली आहे का, याचीदेखील शहानिशा करण्यात येत आहे.