toll  Pudhari
नाशिक

MSRTC National Highway | "राज्याने दिला दिलासा, केंद्राचा टोल मात्र कायम!; 6 महिन्यांत एसटीचा टोल खर्च 133.87 कोटींवर"

MSRTC National Highway | राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला राज्यातील टोल नाक्यांवर टोलमाफी दिली असली, तरी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील १०५ टोल नाक्यांवर एसटीकडून अद्याप टोल आकारला जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • १०५ टोल नाके: केंद्राच्या अखत्यारीतील १०५ टोल नाक्यांवरून एसटीकडून शुल्कवसुली सुरूच.

  • ३० हजार फेऱ्या: दररोज ३० हजार एसटी फेऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरून होतात.

  • ₹५ कोटी ८९ लाख १० हजार: सहा महिन्यांत एसटीच्या टोल खर्चात झालेली अतिरिक्त वाढ.

  • टोलमाफीची मागणी: केंद्राने एसटीला राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी देण्याची कर्मचारी संघटनेची मागणी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसला राज्यातील टोल नाक्यांवर टोलमाफी दिली असली, तरी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील १०५ टोल नाक्यांवर एसटीकडून अद्याप टोल आकारला जात आहे. काही जुन्या टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे.

नव्याने उभारण्यात आलेल्या महामार्गावर नवीन टोल नाके सुरू झाल्याने एसटीच्या खर्चात सातत्याने वाढ होत आहे. या टोल नाक्यांवरून दररोज सुमारे ३० हजार फेऱ्या होत असल्याने त्याचा थेट आर्थिक परिणाम महामंडळावर होत आहे.

जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत एसटीचा एकूण टोल खर्च १३३ कोटी ८७ लाख ३८ हजार रुपये झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत हा खर्च १२८ कोटी ६ लाख २८ हजार रुपये होता. त्यामुळे केवळ सहा महिन्यांतच एसटीच्या टोल खर्चात ५ कोटी ८९ लाख १० हजार रुपयांची वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, दोन्ही स्तरांवर एसटीला मदत करण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात महाराष्ट्राची जीवन वाहिनी असलेल्या एसटीचे टोलच्या माध्यमातून आर्थिक शोषण सुरू असल्याची टीका त्यांनी केली. केंद्र सरकारनेही एसटीला राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफी लागू करून महामंडळावरील आर्थिक भार कमी करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT