Sambhajinagar News : वेतनवाढी, विविध भत्त्यांची रक्कम तात्काळ द्यावी, एसटी सेवानिवृत्त कर्मचारी मेळाव्यात एकमुखी मागणी  File Photo
नाशिक

MSRTC Driver Alco-test News | एसटी प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित! ड्युटीवर जाण्यापूर्वी चालकांची दररोज होणार 'अल्कोटेस्ट'

MSRTC Driver Alco-test News | 'एसटी'ची सुरक्षित प्रवासाची हमी : नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविणार

पुढारी वृत्तसेवा

राज्य परिवहन महामंडळाच्या योजना

  • सुरक्षित प्रवासाची हमी देणारा चांगला निर्णय

  • मद्यपी चालक-वाहकांवर लक्ष केंद्रित राहणार

  • मद्यपी कर्मचाऱ्यांसाठी प्रबोधन कार्यक्रम राबविणार

  • लॉकशीट भरल्यावर पुन्हा होणार महा टेस्ट

  • विश्रांतिगृहात असणार एसटी प्रशासनाची करडी नजर

  • आगारांमध्ये विशेष मद्यपान जनजागृती सप्ताह राबविला जाणार

नाशिक : धनराज माळी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सेवेतील चालक-वाहकांच्या मद्यपानाला आळा घालून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश महामंडळाकडून देण्यात आले आहेत.

एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दि. २५ जानेवारी मुंबईतील परळ बसस्थानकात अचानक भेट दिली असता, तेथील चालक वाहकांच्या विश्रांतिगृहात मद्याच्या बाटल्या आढळल्या होत्या. तसेच काही कर्मचारी मद्य प्राशन केले असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजनाही चौकशी समितीने सुचविल्या होत्या.

नव्या उपाययोजनांनुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांचीही ड्यूटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवली जाईल. तपासणी झाली आहे की, नाही, यावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहायक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे निर्देश आहेत.

तसेच आगार व्यवस्थापकांनीही नियमित नियंत्रण ठेवून या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. बस मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे.

चालकाने नोंद केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा अल्कोटेस्ट तपासणी करून योग्य नोंद घेतल्यानंतरच पुढील मार्गावर पाठविता येणार आहे. ही तपासणी नियमित होत आहे की नाही, याची खात्री स्थानकप्रमुखांनी करावयाची आहे. याशिवाय स्थानक व आगार परिसरातील चालक, वाहक आणि विश्रांतिगृहांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संबंधित विभागातील पालक अधिकाऱ्यांनी आगार व बसस्थानक भेटीदरम्यान या उपाययोजनांची अंमलबजावणी, तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या बाबतीत दक्षता विभागाकडून वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मार्ग तपासणी पथक, वाहतूक निरीक्षक, प्रशिक्षण विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातून तपासणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून सामाजिक संस्थांच्या सहकायनि मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. तसेच आगारांमध्ये 'विशेष मद्यपान जनजागृती सप्ताह' आयोजित करून चालक-वाहक व इतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यासोबतच जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक, चालक वाहक विश्रांतिगृहे तसेच ज्या आगारांमध्ये चालक वाहक जास्त प्रमाणात थांबतात अशा ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिथिगृह परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाइट-पंखे आदी सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT