

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंबड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत गुन्हे शाखा युनिट - २ ने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून संशयिताला अटक केली. हर्षल रमेश परदेशी (१९, रा. बोरमाळ तांडा, पो. नागद, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
अंबड पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचारातील गुन्हा दाखल असून, या प्रकरणी हर्षल परदेशी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट २ चे पथक माहिती गोळा करत असताना हवालदार मनोहर शिंदे आणि चंद्रकांत गवळी यांना माहिती मिळाली होती.
संशयित हा बोरमाळ तांडा (ता. कन्नड) येथे लपून बसल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत संशयिताचा शोध घेत असताना संशयिताला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता.
मात्र, पोलिसांनी पाठलाग करीत त्यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला अंबड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, यशवंत बेंडकोळी, हवालदार मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण यांच्या पथकाने केली.