नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रॅम्पवर बस बाहेर काढताना कर्मचाऱ्याला बसचा धक्का लागून मागील चाकाखाली सापडल्याने झालेल्या दुर्दैवी मृत्यूची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाने घेतली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महामंडळाने राज्यातील सर्व विभागीय कार्यालये व आगारांना सुरक्षेच्या १७ महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये वाहन रॅम्पवर घेताना अथवा बाहेर काढताना यांत्रिक कर्मचाऱ्याची मदत घेणे, जबाबदार कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे आणि रॅम्पमध्ये अन्य कर्मचारी नसल्याची खात्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोल्हापूर आगारात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ या पाळीत साहाय्यक (अतांत्रिक) कर्मचारी नियोजित कर्तव्यावर होते. रॅम्पची स्वच्छता पूर्ण करून ते सकाळी १०.५० वाजता रॅम्पमधून वर येत असताना अन्य सहायक देखभाल झालेली बस क्रमांक (एमएच १४ केक्यू ५९५६) रॅम्पवरून बाहेर काढत होता. त्यावेळी बसचा धक्का लागल्याने कर्मचारी बसच्या मागील चाकात सापडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर महाव्यवस्थापक (यंत्र अभियांत्रिकी) प्र. गौ. जगताप यांनी २१ ऑगस्ट रोजी राज्यातील विभाग नियंत्रकांना सुरक्षेबाबत निर्देश दिले आहेत. वाहन रॅम्पवर घेताना किंवा काढताना वाहनाचे ब्रेक सुस्थितीत असल्याची खात्री करावी, तसेच देखभालीचे काम पूर्ण झाल्याची खात्री करूनच वाहन मार्गस्थ करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अवजड कामे देखभाल रॅम्पवर करू नयेत, रॅम्पवर वाहन निश्चित ठिकाणी थांबविण्यासाठी आवश्यकतेनुसार रॅम्बल्सची व्यवस्था करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. वाहन रॅम्पवर घेताना चालकाला पायरीवरील मानवी हालचाली व साहित्य स्पष्टपणे दिसेल, अशा अंतरावर वाहन उभे करण्याची दक्षता घेण्याचे आदेश आहेत. प्रशिक्षणार्थी कर्मचारी किंवा धारकांचे कर्मचारी वाहनाची देखभाल अथवा दुरुस्ती करत असताना वाहन चालविणार नाहीत, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
रॅम्पवर वाहन घेताना व काढताना यांत्रिक कर्मचाऱ्याची मदत घ्यावी.
वाहन रॅम्पवर नेणे - काढण्यासाठी जबाबदार कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी.
रॅम्पमध्ये अन्य कर्मचारी नसल्याची खात्री करावी.
वाहनाचे ब्रेक सुस्थितीत असल्याची तपासणी करावी.
देखभाल पूर्ण झाल्याची खात्री करूनच वाहन मार्गस्थ करावे.
रॅम्पवर अवजड कामे करू नयेत.
आवश्यकतेनुसार रॅम्बल्सची व्यवस्था करावी.
कार्यशाळा परिसरात २० किमी प्रतितास वेगमर्यादा लागू करावी.
अधिकृत वाहन चालविण्याचा परवाना असल्याच्या चालकाकडून वाहन हाताळावे.
आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत.
प्रशिक्षणार्थी व सीएमसी कर्मचाऱ्यांनी देखभाल सुरू असताना वाहन चालवू नये.
बिघडलेली वाहने प्रवाशांसह कार्यशाळेत आणू नयेत.