नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला २ हजार ६१९ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागणीपत्रांनुसार ३ हजार ८८ पदांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे एकूण पदसंख्या ५ हजार ७०७ झाली होती. आता नव्याने प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार या परीक्षेतील पदसंख्या १६ हजार ७९७ (५ हजार ७०७ अधिक ११ हजार २०) इतकी झाली आहे. आयोगाने ६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
राज्यातील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने अंतरिम अहवाल सादर केला होता. त्यामध्ये महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आयोगाने पदसंख्येतील वाढ आणि परीक्षा प्रक्रियेबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत प्रवेशासाठी विहित कमाल वयोमयदित एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
विशेष म्हणजे, वाढीव पदसंख्येमुळे नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गासाठी उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी १३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज व विकल्प सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र, नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना विकल्प सादर करता येणार आहेत. या परीक्षेसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेला अभ्यासक्रमच लागू राहणार असून, परीक्षा ऑफलाइन पद्धतीने ओएमआर प्रणालीद्वारे घेण्यात येणार आहे.
दरम्यान, वाढीव पदसंख्येनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी अर्ज स्वीकारणे, तसेच आधी अर्ज केलेल्या आणि नव्या संवर्गासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना विकल्प देण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही ३ जानेवारी २०२७ रोजी, तर आवश्यकतेनुसार पुढील परीक्षा २४ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली पदभरतीसंदर्भातील आणि परीक्षा आयोजनासंदर्भातील शुद्धिपत्रके उमेदवारांनी काळजीपूर्वक पाहावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
वेळापत्रक असे-
नव्याने अर्ज व विकल्प सादर करणे- १३ ते २७ नोव्हेंबर २०२६
पहिली पूर्व परीक्षा- ३ जानेवारी २०२७
पदभरतीची आकडेवारी (चौकट)
पुढील परीक्षा - २४ जानेवारी २०२७ सुरुवातीची पदसंख्या : २,६१९
त्यानंतर वाढलेली पदे : ३,०८८
यापूर्वीची सुधारित पदसंख्या : ५,७०७
नव्याने समाविष्ट पदे : ११,०९०
एकूण पदसंख्या : १६,७९७