नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट - क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा - २०२६ संदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. आयोगाने पूर्वी संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी (CBT) पद्धतीने परीक्षा घेण्याची घोषणा केली होती.
मात्र, उमेदवारांकडून आलेल्या मागण्या व निवेदनांचा विचार करून ही परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र गट - क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दि. २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा दि. २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या बदलामुळे अर्ज प्रक्रियेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.
उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ३ ऑगस्ट आहे. शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. आयोगाने जिल्हा केंद्र निवडीबाबतही स्वतंत्र सूचना दिल्या आहेत.