नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (दि. 1 डिसेंबर) दोन सत्रांत आयोजित करण्यात आली होती.
शहरातील 44 केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी 16,962 परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात दोन्ही सत्रांत केवळ 10 हजार 728 विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेची काठीण्य पातळी पाहता जवळपास 6234 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. नाशिक शहरातील 44 केंद्रांवर सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 अशी दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. यासाठी दीड हजारांवर अधिकारी- कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आले होते. यात कृषी पदवीधर असणाऱ्या तरुणांच्याही जागांचा समावेश करावा, यासाठी स्पर्धा परीक्षार्थींनी वारंवार आंदोलनही केली होती. त्यानुसार ठरल्याप्रमाणे रविवारी ही परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांची तपासणी करून हॉल तिकीट पाहून त्यांना आत प्रवेश देण्यात येत होता. परीक्षेचे हॉलतिकीट हे उमेदवारांना नव्याने उपलब्ध करून देण्यात आले होते.