

नाशिक : पोलिस म्हटल्यावर सर्वसामान्य नागरिकांचे रक्षणकर्ता आणि गुन्हेगारांवर वचक ठेवणारा कठोर व्यक्ती समोर उभी राहते, पण या खाकी वर्दीतील माणसांमध्येही माणुसकीचे दर्शन घडते. त्यांच्या आतही भावनिक ओलावा असतो. याची प्रचिती देणारी घटना रविवारी (दि. १) घडली. एक गर्भवती महिला व तिच्या गोंडस बाळाचे प्राण पोलिसांची संवेदनशीलता व सतर्कतेमुळे वाचले. ही बाब तिच्या पती आणि नातलगांना समजताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी महिला पतीसह मालेगावहून नाशिकमध्ये आली होती. परीक्षेचे केंद्र असलेल्या व्ही. एन. नाईक महाविद्यालयात पेपर सुरू होताच तिला प्रसूत कळा सुरू झाल्या. रक्तस्त्राव झाल्याने अस्वस्थ झालेल्या महिलेस इस्पितळात दाखल करण्यासाठी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.
पोलिस हवालदार जयंत जाधव, महिला पोलिस अंमलदार रोशनी भामरे त्यावेळी कर्तव्य बजावत होते. महिलेस मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याचे केव्हीएन नाईक महाविद्यालयातील पर्यवेक्षकांनी पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस हवालदार जाधव व रोशनी भामरे यांनी तत्काळ केंद्राकडे धाव घेत परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या शासकीय वाहनातून महिलेस उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी या महिलेस तपासून मुदतपूर्व प्रसूतीची केस असल्याचे सांगत श्स्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्याची तयारी सुरू केली. ही बाब डॉक्टरांनी पोलिसांनी सांगितली. दरम्यान, पोलिस अंमलदार जयंत जाधव यांनी या महिलेचा पती आणि चुलत भावाचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यांनी रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत कर्तव्य बजावत असलेल्या मुंबई नाका पोलिस ठाण्याचे पोलिसांशी संपर्क साधत एमपीएससीची परीक्षा दुसऱ्या केंद्रावर देत असलेल्या त्यांच्या पतीला याबाबत निरोप दिला. त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनीही पर्यवेक्षकांना माहिती दिली. पतीने तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. महिलेने एका गोंडस मुलीली जन्म दिला असून, दोघींचीही प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांची गोल्डन अवर्समध्ये मदत मिळाली नसती महिला आणि तिच्या बाळाचे काय झाले असते?, असे अनेक प्रश्न आहेत. मात्र व्ही. एन. नाईक महाविद्यालयात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि सतर्कता यातून मायलेकी सुरक्षित आहेत. पोलिसांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.